Join us  

कोरोनाची भीती दूर सारत पर्यटकांनी लुटला आनंद; कोकणातील समुद्रकिनारे गजबजले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 1:00 AM

कोकणातील समुद्रकिनारे गजबजले; तीर्थस्थळी भाविकांची गर्दी

मुंबई/कोल्हापूर : कोरोनाची भीती दूर सारत, सलग मिळालेल्या सुट्ट्यांचा लाभ घेत, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर रविवारी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसले. लॉक डाऊननंतर म्हणजे जवळपास वर्षभराने पर्यटन स्थळे बहरल्याने तेथील व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.  ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी मात्र झाली.

कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांनी रांगा लावल्या. जुना राजवाडा येथील भवानीमातेचे दर्शन, त्यानंतर नवीन राजवाडा, जोतिबा, किल्ले पन्हाळगड, नृसिंहवाडी, खिद्रापूर, गगनबावडा, कणेरी, रंकाळा तलाव, अशा विविध ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली. शहरात प्रवेश करणारा स्टेशन रोड तसेच चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली.  कोल्हापुरी मिसळ, वडापाव अशा पदार्थांची चव चाखण्यासाठी पर्यटकांनी हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्ये गर्दी केली. गुळाच्या एक किलोच्या ढेपा आणि कोल्हापुरी चपलांची खरेदीही मोठ्या प्रमाणात करताना पर्यटक दिसत होते.     

वाई-पाचगणी गजबजले कास तलावावर पर्यटकांची रविवारी मोठी गर्दी झाली. वाई, महाबळेश्वर, पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहेत. बाजारपेठाही पर्यटकांनी फुलल्या असल्याने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथे मुंबई, पुण्याहून पर्यटक आले आहेत. 

कोकण हाऊसफुल्लरत्नागिरी : तळकोकणातील दोन्ही जिल्ह्यांमधील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे सर्व रिसाॅर्ट ५ जानेवारीपर्यंत फुल्ल झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजली आहे.सिंधुदुर्ग : सागरी पर्यटन सुरू झाल्याने मालवण किल्ला, तारकर्ली, देवबाग, ब्ल्यू स्टॅग मिळालेली भोगवे किनारपट्टी फुलली आहे. 

शिर्डीत भाविकांच्या रांगा शिर्डी : शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ऑनलाइन बुकिंग करूनच साई दर्शनासाठी या, असे आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. अडीच दिवसांत हजारो भाविकांंनी साई दर्शन घेतले. नवीन वर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी भाविकांची ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पर्यटनमुंबई