Join us  

जर्मनीने केलेल्या उपाययोजनेमुळे कोरोना आला आटोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 6:38 PM

जर्मनी मात्र या विषाणूच्या जाळ्यात म्हणावं तेवढा अडकला नाही. टक्केवारीच जर काढायची झाली तर युरोपातले दुसरे देश ६ ते ७ % बाधित झाले असतील तिथे जर्मनी ०.३ % वर आहे.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : कोरोना विषाणूच्या उद्रेकामूळे  सगळं विश्व हादरून गेलंय. महासत्ता असलेल्या अमेरिकेने शरणागती पत्करली, इटली सारख्या देशात जिथे सर्वोत्तम वैद्यकीय सेवा असूनही त्यांनी मात खाल्ली. फ्रान्स, स्पेन, इंग्लंड यांची सुद्धा काही वेगळी अवस्था नाही. जर्मनी मात्र या विषाणूच्या जाळ्यात म्हणावं तेवढा अडकला नाही. टक्केवारीच जर काढायची झाली तर युरोपातले दुसरे देश ६ ते ७ % बाधित झाले असतील तिथे जर्मनी ०.३ % वर आहे.

मूळच्या मराठवाड्यातील असलेल्या आणि पतीच्या नोकरीमुळे जर्मनीत,फ्रँकफर्ट येथे वास्तव्यास असलेल्या प्राजक्ता अनिकेत देशमुख यांनी खास लोकमतला माहिती दिली.जर्मनी हा भारताच्या वेळेप्रमाणे सुमारे २.५ तास मागे आहे,मात्र आमच्या कुटुंबाच्या वॉटसग्रुपवरून रोज लोकमतचा अंक जर्मनीत वाचायला मिळतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. येथे आरोग्य सुविधा व व्यवस्था खूप चांगल्या स्थितीत आहे.येथील सर्वसामान्य चिकित्सकांचा जाळं मोठ्या दवाखान्यांवरचा ताण कमी करत असून  सौम्य केसेस जनरल चिकित्सक हाताळतात आणि गंभीर केसेसच मोठया दवाखान्यापर्यंत जातात आणि त्यांचा ताण कमी होतो. तसेच पूर्वीपासून येथील अतिदक्षता विभागाची क्षमता अधिक आहे शिवाय  सरकारने दवाखान्यांना आवाहन केले की वैकल्पिक शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्यात आणि त्याचमुळे अतिदक्षता विभागाची संख्याही वाढली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

जर्मनीने सुरुवातीपासून कोरोनाच्या या परिस्थितीकडे गांभीर्याने पहिले आणि चाचणी क्षमता वाढवली आता पर्यंत पंधरा लक्ष जर्मन नागरिकांची चाचणी यशस्वी रित्या पार पडली. शिस्त म्हणजे जर्मन लोकांचा एक विशेष गुण म्हणावा लागेल. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे येथील नागरिक काटेकोरपणे पालन करतात. त्यासाठी पोलिसांना विशेष कष्ट घ्यावे लागले नाही. जेव्हा  पंतप्रधान अँगेला मर्केल देशाला संबोधतात, तेव्हा त्यांच्या आदेशांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे असे प्रत्येक जर्मन नागरिकाला वाटते अशी माहिती प्राजक्ता देशमुख यांनी दिली.

जर्मनीतील मध्यवर्ती ठिकाणे जसे सुपरमार्केट, भाजीपाल्याचे दुकाने इत्यादी ठिकाणी स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टंसिन्ग काटेकोरपणे केले जाते. येथील उद्यानातले झोके, घसरगुंड्या हे काही ठिकाणी खुले केले जाणार आहे, ही येथील नागरिकांसाठी चांगली  बातमी आहे.मात्र येथील शाळा सुरु करण्यावरचा निर्णय लांबला असून सध्या येथील विद्यार्थी ऑनलाइनवर अभ्यास करतात.

आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या निर्णयाला १३ जून पर्यंत लांबवण्यात आले आहे. २७ एप्रिल येथील पब्लिक ट्रान्सपोर्ट, सुपरमार्केट, कुठल्याही मध्यवर्ती ठिकाणी मास्क अनिवार्य केलय.काही राज्यात जनजीवन सामान्य होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रार्थना स्थळे, मुसीयूम, प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येतील.या सगळ्या महत्वाच्या घडामोडीचे श्रेय अर्थातच जर्मनीच्या पंतप्रधान अँगेला मर्केल यांना जाते,कोरोना ही अशी पळण्याची शर्यत आहे की त्याचा अंतिम टप्पा कुठे आहे माहिती नाहीये असे मर्केल यांनी येथील नागरिकांना सांगितले

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या