Join us

कोरोनाने अडवली आंब्याची परदेशातील वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:06 IST

निर्यातीत ४० टक्क्यांची घट; आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंधांचा परिणामसुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने आंब्याची परदेशात जाण्याची ...

निर्यातीत ४० टक्क्यांची घट; आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंधांचा परिणाम

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाने आंब्याची परदेशात जाण्याची वाट अडवली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या निर्यातीत जवळपास ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातून हवाई आणि जलमार्गे आंब्याची निर्यात होते. त्यातही जलद वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा प्रामुख्याने अवलंब केला जातो. एअर कार्गो सुविधेचे दर चढे असल्याने प्रवासी विमानांद्वारे आंबा निर्यात करण्यावर व्यापारी भर देतात. प्रवासी विमाने पार्सलसाठी राखीव असलेल्या जागेतून आंब्याचे वहन करतात. भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या जवळपास ९० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी विमानफेऱ्यांच्या संख्येवरही परिणाम झाल्याने आंब्याच्या निर्यातीत अडथळे येत आहेत.

गेल्या वर्षी प्रवासी विमानांच्या साहाय्याने ४९,६५९ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून जवळपास ४ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. परंतु, यंदा विमान प्रवासावरील निर्बंधांमुळे आतापर्यंत केवळ ३० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करता आला. त्यामुळे उत्पन्न २ हजार ३०० काेटी रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

* वेळेत अंमलबजावणी झालीच नाही

जलवाहतुकीद्वारे आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करा, सुविधा वाढवा, अशा सूचना सरकारला केल्या होत्या. त्याची वेळीच अंमलबजावणी झाली असती तर हवाई वाहतुकीवरील अवलंबित्व संपले असते आणि सध्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळता आले असते.

-चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

* तूट भरून काढणे अवघड

आंब्याच्या निर्यातीसाठी प्रवासी विमानांवर अवलंबून राहावे लागते, कारण एअर कार्गो सुविधेचे दर हे तिप्पट आहेत. यंदा प्रवासी विमानांच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका आंब्याच्या निर्यातीला बसला. निर्यातक्षम आंब्याचा हंगाम ओसरत आल्याने ही तूट भरून काढणे अवघड आहे.

-रत्नाकर कराळे, आंबा निर्यातदार

.........

सर्वाधिक निर्यात – युएई, युके, सौदी अरेबिया, नेपाळ, कतार, नेदरलॅण्ड

* किती झाली निर्यात?

गेल्या वर्षी - ४९,६५९ मेट्रिक टन

यंदा - ३० हजार मेट्रिक टन

* उत्पन्न किती मिळाले?

गेल्या वर्षी - ४ हजार कोटी रुपये.

यंदा - २ हजार ३०० कोटी रुपये.

-----------------------------------------------