Join us  

Corona virus: FDA च्या अध्यक्षपदी परीमल सिंग, अभिमन्यू काळेंची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:31 PM

Corona virus: रेमडीसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून राज्यासाठी इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देरेमडीसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून राज्यासाठी इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे

मुंबई - राज्यात कोरोना महामारीचं संकट गडद बनलं असतानाच ऑक्सिजन आणि रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. काळे यांच्याजागी परिमल सिंग यांना पदभार देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती अन् अन्न व औषध विभागाच्या कामगिरीकडे लागलेल्या नजरा पाहता ही बदली करण्यात आली आहे.  

रेमडीसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून राज्यासाठी इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. काळे यांच्यानंतर परिमल सिंग यांच्याकडे एफडाए आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहे. राज्यात रमेडीसीवीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसत आहे. त्यातच, विलेपार्ले पोलिस स्टेशनला घडलेला प्रकार, विरोधी पक्षाचा हस्तक्षेप आणि एफडीए आयुक्त काळेंनी दिलेल्या पत्रावर कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, काळेंवर कारवाई करण्याची मागणी कॅबिनेटच्या बैठकीत काही मंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, आजच्या बैठकीनंतर अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसहॉस्पिटलमंत्रीबदली