Join us  

CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, 71,838 कुटुंब असलेल्या 1305 इमारती सील!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 20, 2021 9:05 PM

महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतींमध्ये 71,838 कुटुंब राहतात. मुंबईमध्ये 2,749 कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर बीएमसीने हे पाऊल उचलले आहे. (Coronavirus in Maharashtra)

मुंबई - महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona virus) धोका वाढला आहे. येथे पुन्हा एका कोरोना व्हायरस वेगाने पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळेच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक हजारहून अधिक इमारती सील केल्या आहेत. महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतींमध्ये 71,838 कुटुंब राहतात. मुंबईमध्ये 2,749 कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर बीएमसीने हे पाऊल उचलले आहे. (Corona virus effect more than thousand buildings sealed in Mumbai)

महाराष्ट्रात तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 6,112 नवे कोरोनाबाधित समोर आले. यातील अधिकांश कोरोनाबाधित अकोला, पुणे आणि मुंबई भागातील आहेत. यापूर्वी 30 ऑक्टोबरला महाराष्ट्रात एका दिवसात 6,000 हून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. यानंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती.

१० रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील, चार प्रभाग समित्यांमध्ये अधिक संक्रमण

या नव्या कोरोनाबाधितांबरोबर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20,87,632 झाली असून आणखी 44 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 51,713 झाली आहे. या 44 मृतांपैकी 19 जणांचा मृत्यू गेल्या 48 तासांत झाला आहे. 10 जणांचा मृत्यू  गेल्या आठवड्यात झाला तर 15 जणांचा मृत्यू त्याआधी झाला आहे.

मुंबईसाठी नवी गाईडलाईन -बीएमसीने गुरुवारी वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत मुंबईसाठी नवी गाईडलाईन जारी केली होती. यानुसार, कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या नव्या हॉटस्पॉटचे मॅपिंग करून तेथील जास्‍तीत जास्‍त चाचण्‍या केल्या जाणार आहेत. तसेच एका रुग्‍णामागे किमान 15 नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाच बाधित रुग्ण आढळून असल्यास आता संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनामुक्तांपेक्षा दुपटीहून अधिक बाधित !

ठाण्यात एका इमारतीत 10 रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील -मुंबईत सध्या एका इमारतीत 5 कोरोना बाधित आढळले तर इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ठाण्यात एका इमारतीत 10 रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जाणार आहे. 200 मीटर भागात 15 रुग्ण आढळल्यास तो भाग सील केला जाणार आहे. तसेच, कोरोनाचे संक्रमण वाढल्यास त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेशी चर्चा झाली असून खाजगी रुग्णालये गरज असल्यास पुन्हा अधिग्रहित केली जाणार आहेत. या ठिकाणी पुरेसे बेड उपलब्ध होणार आहेत. सध्या ठाण्यात 2059 बेड उपलब्ध असल्याची माहिती ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा  यांनी दिली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका