Join us  

Corona virus : कोरोनाच्या धास्तीने चिकन 10 ₹ किलो, विक्रेत्यांचे डोळे पाणावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 4:15 PM

Corona virus : कोरोनामुळे चिकन दरावर मोठा परिणाम झाला असून अक्षरश: 10 रुपये किलोपर्यंत चिकनचा दर घसरला आहे.

मुंबई - कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत 3661 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात 1752 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, त्यापैकी 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभर पसरला आहे. मात्र, या व्हायरससोबत अफवाही मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. नॉनव्हेज पदार्थांमुळे कोरोनाची लागत होते, अशा अफवा पसरल्याने चिकन मार्केटमध्ये मोठी मंदी आली आहे. 

कोरोनामुळे चिकन दरावर मोठा परिणाम झाला असून अक्षरश: 10 रुपये किलोपर्यंत चिकनचा दर घसरला आहे. अमरावती, नाशिक, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यात 10 रुपये दराने चिकन मिळत असल्याच्या पाट्याही लागल्या आहेत. तर, कुक्कुटपालन करणारे आणि चिकनविक्री करणारे दुकानदार यांना कोरोनापेक्षा चिकनच्या कोसळलेल्या दराची मोठी धास्ती बसली आहे. आपल्या लाखो रुपयांच्या धंद्यावर या कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यांवर, कुक्कुलपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.  

दरम्यान, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी याविषयी माहिती दिली. कोरोना व्हायरसची लागण चिकन खाल्ल्यामुळे होत नाही, असं सुनिल केदार यांनी स्पष्ट केलं. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसला. कोरोनाच्या भीतीने अनेक मांसाहारींनी चिकनकडे पाठ फिरवल्याचं गेल्या काही आठवड्यांत समोर आलं होतं. तर, सोशल मीडियावर चिकन 10 रुपये अन् मास्क 100 रुपये असे विनोदही व्हायरल झाले आहेत.  

दरम्यान, चीनमध्ये जवळपास 80 हजार कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी 3000 जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती आहे. जगभरात 1 लाख 07 हजार 802 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये हळू हळू कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मात्र, चीनमधील व्यापार आणि बाजारापेठेत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर 17.02 टक्के घसरण झाली आहे. तर आयात होणाऱ्या व्यापारातही 4 टक्के कमतरता आली आहे.  

टॅग्स :कोरोनाअमरावतीउस्मानाबादमुंबई