Join us  

Corona virus : ग्राहकांनो गर्दी टाळा, वीज बिल भरण्यासाठी 24 तास ऑनलाईन पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:10 PM

ग्राहकांनी रांगेत उभे राहून गर्दी करण्यापेक्षा २४ तास उपलब्ध असलेल्या महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा वापर करावा

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या विविध सेवेचा वापर करावा अशी विनंती भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केली आहे. भांडुप  समवेत महावितरणच्या विविध कार्यालयात खबरदारी म्हणून, कर्मचारी व अधिकारी यांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयात ग्राहकांसाठीही सॅनिटायजरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, भांडुप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी ऑनलाईन सेवेचा जास्तीतजास्त वापर करून, थकबाकीची रक्कम भरण्याबाबत आवाहन केले आहे. 

ग्राहकांनी रांगेत उभे राहून गर्दी करण्यापेक्षा २४ तास उपलब्ध असलेल्या महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा वापर करावा. ग्राहकांनी पर्यायांचा वापर केला तर शासनाने केलेल्या आवाहनाप्रमाणे गर्दी टाळता येईल.

पर्याय खालीलप्रमाणे...

लघुदाब व उच्चदाब ग्राहक एस.बी.आय च्या वर्चुअल अकाउंटचा वापर करून आर.टी.जी.एस किंवा एन.ई.एफ.टी द्वारे वीज बिल भरणा करू शकतात (एस.बी.आय च्या वर्चुअल अकाउंट प्रत्येक ग्राहकांना देण्यात येते, तसेच त्यांच्या बिलावारही छापुन येते).

महावितरणच्या मोबाइल अ‍ॅप मधून कॅश कार्ड , यु. पी. आय द्वारे ग्राहक घर बसल्या वीज बिल भरू शकतात. 

महावितरणच्या संकेत स्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून कॅश कार्ड , अथवा  नेट बँकिंगद्वारे वीज बिल भरता येते. 

महावितरणची वेब सेल्फ सर्विस ग्राहकांसाठी खूप उपयोगी असून यामध्ये ग्राहक वीज बिल भरू शकतो, तसेच मागील पेमेंटबाबत माहितीही घेऊ शकतो. 

ज्या ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे त्यांना कंपनीकडून वीज बिलाबाबत  एस.एम.एस पाठविण्यात येते. या एस.एम.एस मध्ये असलेल्या लिंक/ युआरएल वर क्लीक करून ग्राहक वीज बिल भरणा करू शकतो. जर ग्राहकांनी नोंदणी केली नसेल, अशा ग्राहकांनी महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या कॉन्सुमर पोर्टलवरद्वारे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ३४३५/ १८०० १०२ ३४३५ वर संपर्क करून नोंदणी करता येते. अ‍ॅमेझोन, पे.टी.एम, फ्रीचार्ज , जी पे, भीम अ‍ॅप, फोन पे अशा विविध पेमेंट माध्यमातून ग्राहक वीज बिल भरणा करू शकतो. 

ग्राहकाला महावितरणच्या मध्यवर्ती ग्रुप पेमेंट सुविधेचा वापर करून घर बसल्या वीज बिल भरता येते. 

टॅग्स :वीजकोरोना वायरस बातम्यामुंबई