Join us  

Corona Vaccine: लहानग्यांच्या लसीच्या ट्रायलसाठी केंद्राला साकडे; मुंबई महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 9:40 AM

प्रस्तावाला केंद्र सरकारकडून अद्याप हिरवा कंदील नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जाते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने विचार केला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची ‘ट्रायल’ घेतली जाणार आहे. यासाठी पालिकेने आवश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा तयार ठेवली आहे. परवानगीसाठी केंद्र सरकारला पत्रही दिले आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

या प्रस्तावाला अद्याप परवानगी मिळाली नसल्याचीही माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जाते आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे ३९ लाख ४७ हजार ४२२ डोस देण्यात आले आहेत. मात्र, सध्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने दिवसाला एक लाखाहून जास्त लसीकरण करता येईल अशी व्यवस्थाही उभी केली आहे.

केईएम, नायर रुग्णालयात ट्रायलnकोरोना रोखण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेशी लस उपलब्ध करण्यासाठी राज्य व पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. nतिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने १२ ते १८ वयोगटातील लसीकरणाची ट्रायल घेतली जाणार आहे. ही ट्रायल केईएम, नायर रुग्णालयात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

nविशेष म्हणजे पालिका दिवसाला एक लाख लसीकरणाचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. nसद्य:स्थितीत सुमारे एक लाख लसींचे डोसही उपलब्ध आहेत. त्यामुळे पालिका मुंबईकरांचे लसीकरण लवकरच पूर्ण करेल, असा विश्वासही काकाणी यांनी व्यक्त केला.

कोरोनामुळे ४५० वीज कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांचा मृत्यू मुंबई : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांत १ लाख २० हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करीत असून, त्यापैकी ११ हजार ३५० जणांना कोरोनाने ग्रासले आहे. यापैकी ४५० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली.

वीज उद्योगांतील परिस्थितीकडे ऊर्जा मंत्रालयाने पुरेसे लक्ष दिले नाही. या स्थितीची दखल घेतली नाही. परिणामी ही स्थिती ओढवल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. याच कारणात्सव संघटनांनी २४ ते ३१ मे काळात राज्यात सर्वत्र काम बंद आंदोलनही केले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सचिवांनी वाटाघाटी करून फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा व ५० लाख अनुदानावर फेर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्याचे आश्वान दिले. त्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. आता तरी न्यायोचित मागणी मान्य करावी, असे वीज कामगार नेते कृष्णा भोयर यांनी सांगितले.

राज्यात १०,४४२ रुग्णमुंबई : राज्यात रविवारी १० हजार ४४२ रुग्ण आणि ४८३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५९ लाख ८ हजार ९९२ झाली असून मृतांचा एकूण आकडा १ लाख ११ हजार १०४ इतका आहे. राज्यात १ लाख ५५ हजार ५८८ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात ७ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ५६ लाख ३९ हजार २७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ टक्के झाले आहे.  

मुंबईत कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ६ जून ते १२ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१० टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा काळ ६५३ दिवसांवर पोहोचला आहे. शहर उपनगरांत रविवारी ७०० रुग्णांचे निदान झाले असून १९ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे, तर दिवसभरात ७०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस