Join us  

Corona Vaccination : मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण केंद्र खुली राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 7:08 PM

Corona Vaccination: मुंबईतील १८ वर्षांवरील ९५ लाख नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ३७ लाख ४६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

मुंबई - मागील आठवड्यात महापालिकेने राबविलेल्या महिला विशेष लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात एक लाख २७ हजार महिलांचे लसीकरण त्या दिवशी झाले होते. त्यामुळे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी पालिका आणि सरकारी केंद्रांवर सकाळी दहा ते सायंकाळी ६ या वेळेत फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.  

मुंबईतील १८ वर्षांवरील ९५ लाख नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ३७ लाख ४६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे महिलांना लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिका प्रशासनाने ही मोहीम राबवली आहे.

१७ सप्टेंबर रोजी पहिल्या वेळेस ही मोहीम राबविली असता पालिका आणि सरकारी केंद्रांवर एक लाख सात हजार महिलांनी लस घेतली होती. तर खासगी केंद्र मिळून एक लाख २७ हजार महिलांनी लस घेतली होती. सोमवारी महिलांना लस घेण्यास थेट प्रवेश देण्यात येणार आहे.  

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई