Join us  

Corona Vaccination : शिक्षक व १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना 'या' दिवशी मिळणार थेट लस; ऑनलाईन पूर्व नोंदणीची गरज नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:09 PM

Corona Vaccination: मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट येऊन संबंधित पात्र शिक्षक व विद्यार्थ्याला लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही.

मुंबई - राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्याने ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार आहे. शहर भागात इयत्ता ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार असल्याने पालिका प्रशासनानेही त्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. यासाठी मंगळवार दि. २८ सप्टेंबर  रोजी स. ९ ते दु.२ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे लसीकरण होणार आहे. 

शिक्षक व विद्यार्थी यांना पहिली डोस घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असल्यास (कोविशिल्‍ड संदर्भात पहिल्या डोसनंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सीन असल्यास पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्‍यास) दुसरा डोस घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना, पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे लागणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक व १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. 

थेट लस मिळणार...मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट येऊन संबंधित पात्र शिक्षक व विद्यार्थ्याला लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे. 

दुसऱ्या सत्रात सर्वांना डोस...मंगळवारी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत, दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत ७० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित शिक्षकांचे विभागवार लसीकरण पूर्ण करण्यात येईल.- किशोरी पेडणेकर (महापौर, मुंबई)

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई