Join us  

कोरोना  लसीकरणाच्या  शीतगृहाचे काम जानेवारी २०२१ अखेर पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 3:52 PM

Corona vaccination cold storage : कांजुरमार्ग (पूर्व ) येथे निश्चित करण्यात आलेल्या शीतगृहाच्या जागेची पाहणी 

 

मुंबई : कोविड-१९ संभाव्य लसीकरणाच्या साठ्यासाठी महानगरपालिकेतर्फे  कांजुरमार्ग ( पूर्व) येथे निश्चित करण्यात आलेल्या शीतगृहाचे काम  जानेवारी २०२१ अखेरपर्यंत  पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

बृहन्मुंबई  महानगरपालिकेतर्फे  कांजुरमार्ग ( पूर्व) येथे निश्चित करण्यात येणाऱ्या शीतगृहाच्या जागेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शनिवार दि.०५ डिसेंबर २०२० रोजी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला,त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती प्रवीणा मोरजकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुवर्णा करंजेकर, नगरसेवक श्री. अमेय घोले, सहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ.शीला जगताप, डॉ.अविनाश अंकुश, डॉ. राजूसिंग राठोड तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, कोरोना- १९ या लसीच्या साठवणुकीसाठी कांजुरमार्ग परिवार संकुलात एक अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी संकुलातील पाच माळांपैकी तीन माळे हे शितगृह केंद्रासाठी महानगरपालिकेतर्फे निश्चित करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. बाहेरील वातावरणाचा लसींवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी सदर जागेवर +२ डिग्री सेल्सियस ते +८ डिग्री सेल्सिअस तपमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरचे दोन  उपकरणे (walk in cooler)  बसविण्यात  येणार आहे. त्यासोबतच - 15 डिग्री सेल्सिअस ते - 25 डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले २० क्युबिक मीटरचे (walk in freezer) बसविण्यात येणार  असल्याचे महापौरांनी सांगितले.सदर शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेला कोविड -१९ या लसीचा पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. सदर शीतगृहे हे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठावर चालविण्यात येणार असल्याने विजेची बचत होऊन पर्यावरणाला हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिट निहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाल्या. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका