Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्यांनी बाजारपेठांत वेग पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:17 IST

कोरोना चाचण्यांनी बाजारपेठांत वेग पकडलाकुर्ल्यातल्या बैलबाजारात कोरोना चाचण्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी मुंबई ...

कोरोना चाचण्यांनी बाजारपेठांत वेग पकडला

कुर्ल्यातल्या बैलबाजारात कोरोना चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी मुंबई महापालिका वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता कोरोनाच्या चाचण्या बाजारपेठेत केल्या जात असून, नागरिकांसह व्यापारी वर्गाकडूनही प्रशासनाला सहकार्य मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या एल विभागांतर्गत कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार येथे शुक्रवारी दिवसभर कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बैलबाजार येथील भाटिया महाविद्यालयासमोरील रस्त्यालगत मुंबई महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. चाचणी करण्यासाठीचे सर्व साहित्य एका टेबलावर मांडण्यात आले होते. या वेळी उपस्थित व्यापारी, फेरीवाले, ग्राहक यांच्यासह स्थानिक परिसरातील नागरिकदेखील तपासणी करून घेत होते.

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजारसह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळी आहेत, इमारती आहेत, झोपड्या आहेत, मिठी नदी आहे. येथे मोठी वस्ती आहे. कोरोना जेव्हा मुंबईत दाखल झाला तेव्हा झोपड्यांमध्ये त्याचा मोठा फैलाव होईल, अशी भीती व्यक्त केली गेली होती. मात्र आम्ही स्थानिकांच्या मदतीने, मुंबई महापालिकेच्या मदतीने सातत्याने परिसरामध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली. शिवाय प्रत्येक परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. परिणामी बैलबाजार, वाडिया इस्टेटसारख्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले, अशी माहिती येथे कोरोनाकाळात कार्यरत असलेले भाजपचे कलिना विधानसभा उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी दिली. आजही येथे सातत्याने कोरोनाचे नियम पाळले जात आहेत. स्वच्छत ठेवण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील, याची काळजी घेतली जात असून, महापालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असून, दुकानदार, दुकानात-हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक इत्यादींची कोविडविषयक चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.