Join us  

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आता थेट पालिकेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:20 AM

प्रशासनाचा निर्णय; रुग्णांना अहवाल पाठविण्यास प्रयोगशाळांना बंदी 

मुंबई : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर यापुढे प्रयोगशाळांना संबंधित अहवाल थेट रुग्णांना पाठवण्यास बंदी करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार रुग्ण बाधित असल्यास त्याचा अहवाल पालिकेकडून दिला जाणार आहे. तसेच रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही महापालिकेने उचलली आहे.कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाबरोबरच पालिकेला याबाबत कळविण्यात येत होते. मात्र रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर निर्माण होणारी भीती आणि गोंधळ टाळण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा नियमात बदल केले आहेत.महापालिकेच्या प्रत्येकी चार आणि इतर खासगी मिळून २५ आणि त्यांच्या अनेक शाखांच्या माध्यमातून कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या प्रयोगशाळांमध्ये संशयित रुग्ण जाऊन चाचणी करून घेतात. किंवा काही ठिकाणी प्रयोगशाळेतील कर्मचारी रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी करतात. नियमानुसार चाचणी अहवाल २४ ते ४८ तासांत संबंधित रुग्णाला पाठविण्यात येतो. मात्र काही खासगी प्रयोगशाळा अहवाल देण्यास विलंब करीत असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.दिरंगाई करणाऱ्या अशा दोन मोठ्या प्रयोग शाळांवर बंदीची कारवाईही करण्यात आली होती. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाला खाट मिळवण्यास विलंब होत असल्याची तक्रार येत असते. हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेमार्फत पॉझिटिव्ह रुग्णाला कळवण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास प्रयोगशाळा रुग्णाला थेट सांगू शकते, असेही परिपत्रकात नमूद आहे.हेल्पलाइनसह वॉर रूम उपलब्धनागरी तक्रारींसाठीच्या पालिकेचा १९१६ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध असून सर्व २४ वॉर्डमध्ये पालिकेच्या माध्यमातून वॉर रूम सुरू करण्यात आले आहेत. कारोनाबाधित रुग्णाला तातडीने हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात येईल. तर लक्षणे नसलेल्या आणि होम क्वारंटाइन होण्याची सुविधा असल्यास संबंधितांच्या गरजेनुसार व्यवस्था करण्यात येणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका