Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे निराधार महिलांना विद्यमान योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील बळींच्या संख्येने लाइटचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना बळींमुळे कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर ...

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील बळींच्या संख्येने लाइटचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना बळींमुळे कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर नवे प्रश्न निर्माण होत आहेत. विशेषतः महिला आणि बालकांच्या भवितव्याचे गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. बालकांसाठी शासन स्तरावर नव्या योजनांची आखणी, अंमलबजावणीचे काम सुरू झाले आहे, तर निराधार महिलांना विद्यमान योजनांतून अधिकाधिक लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार ३९० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मुंबईतील मृतांचा आकडा १५ हजार २२७ इतका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंमुळे कौटुंबिक स्तरावर जटिल प्रश्न तयार झाले आहेत. कोरोनाबाधित आणि मृतांमध्ये पुरुषांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या महिलांच्या आणि बालकांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी राज्य शासनाने योजना आणली. यात अनाथ बालकांच्या नावे पाच लाखांची मुदतठेव ठेवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर माहिती जमविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

बालकांप्रमाणेच अनेक महिलांनी आपले पती कोरोनाने गमावले आहेत. काही ठिकाणी फक्त पुरुषच कमावता असल्याने आर्थिक घडी विस्कटून या महिला निराधार झाल्या आहेत, तर मुलांची जबाबदारी अचानक एकट्या महिलांवर पडल्याचेही चित्र आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून अशा महिलांना साहाय्यता पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात ज्या महिलांचे पती मृत्युमुखी पडले आहेत आणि त्यांच्यावर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडली आहे त्यांना बालसंगोपन योजनेतून साहाय्यता देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेतून सध्या बालकांना प्रतिमहिना ११०० रुपये इतके संगोपन अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ अशा महिलांना देण्याचे प्रयत्न सुरू असून, अनुदानाची रक्कमही वाढविण्याचे प्रयत्न आहेत. याशिवाय, विद्यमान संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना देण्याबाबत चाचपणी सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेत अधिकाधिक पात्र महिलांना लाभ द्यावा, तसेच व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण ७१७१७२

बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८१९२१

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण १७७८२

एकूण मृत्यू १५२२७

वडील गमावलेले पाल्य

मुंबई शहर ८६

मुंबई उपनगर ४७४