Join us  

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; घाबरू नका, पण काळजी घ्या, पालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 6:41 AM

मुंबईत पुन्हा काेराेना रुग्ण शंभरी पार 

मुंबई : मुंबईत मंगळवारी १०२ नवे कोराेना रुग्ण आढळून आले आहेत, तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ५४९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत वाढलेल्या या रुग्णवाढीबद्दल मुंबईकरांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९ हजार ५१५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोनावाढीचा दर ०.००७ टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात आढळून आलेल्या १०२ रुग्णांपैकी ९९ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ०४४ खाटा असून, त्यापैकी १९ खाटांवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ५९ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अशी झाली रुग्णसंख्येत वाढ मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन १३ एप्रिलला ७३, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ७२ तर २४ एप्रिलला ७३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात वाढ होऊन १०२ रुग्णांची, तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

६८ वेळा शून्य मृत्यूमुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ६८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा, मार्च महिन्यात २७ वेळा, तर एप्रिल महिन्यात २३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या