वडाळ्यातील शिक्षकाची फसवणूक
वडाळ्यातील शिक्षकाची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे खासगी शिकवणी बंद झाली आणि नवीन नोकरीच्या शोधात ऑनलाइन ठगांमुळे बँकेतील जमा पुंजीवर सायबर ठगांनी डल्ला मारल्याचा प्रकार वडाळ्यात समोर आला आहे. यामध्ये ४२ वर्षीय शिक्षकाची ३ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वडाळा परिसरात राहणारे ४२ वर्षीय तक्रारदार खासगी शिकवणी घ्यायचे. त्यावरच घरखर्च भागत होता. शिकवणी बंद झाल्याने त्यांनी नवीन नोकरीसाठी ऑनलाइन शोध सुरू केला.
शाइन डॉट कॉमवर त्यांनी १ जून रोजी विमानतळावर नोकरी असल्याची जाहिरात पाहून संपर्क साधला. संबंधित कॉलधारकाने इंडिगो एअर लाइनमधून बोलत असल्याचे सांगून तिकीट तपासणीस या पदाची मुंबई एअरपोर्ट येथे नोकरी असल्याचे सांगितले.
या पदाच्या नोकरीकरिता ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. ऑनलाइन परीक्षेकरिता नोंदणी फी दीड हजार भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. ठरल्याप्रमाणे ३ जून रोजी ऑनलाइन परीक्षा झाली. मेलवरून प्रमाणपत्रही मिळाले. पुढे विविध कारणे पुढे करीत त्यांच्याकडून ३ लाख ७९ हजार रुपये उकळले.
आणखी पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत देण्यास सांगताच कॉलधारक नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी गेल्या आठवड्यात गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिक्षकाला मानसिक धक्का बसला आहे.