Join us  

कोरोना रुग्णालय की कारागृह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 6:03 PM

ठाण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाने मांडले भयानक वास्तव, ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या दर्जाबबाबत प्रश्नचिन्ह

संदीप शिंदे

मुंबई - मी जेवलो ती भांडी मलाच धुवायला सांगितली. ती धुताना पाण्याचा पाईप तुटला. त्या पाण्यातच मला बसावे लागले. बेडच्या बाजूला पाल घिरट्या घालत होते. मला खासगी रुग्णालयात जाऊ द्या अशी विनवणी मी करत होतो. तरी, माझ्याकडे कुणी लक्ष देत नव्हते. दोन दिवस अक्षरश: कारागृहात डांबल्याचा अनुभव मी घेतला . . . ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाने हे भयानक वास्तव आपल्या निकटवर्तीयांकडे मांडले आहे. त्यातून ठाण्यातील कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सज्ज केलेल्या या सरकारी हॉस्पिटलच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. 

ठाणे शहरांतील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल व्हायला नको म्हणून ठाणे सिव्हिल हॉस्पिटल सज्ज करण्यात आल्याचे सरकारी यंत्रणांनी जाहिर केले आहे. मात्र, इथे दाखल होणा-या रुग्णांचा अनुभव धक्कादायक आहे. गेल्या आठवड्यात ठाण्यातील एक उच्चशिक्षित कोरोनाग्रस्त रुग्णाला इथे उपचारांसाठी दाखल केले होते. परंतु, इथली गैरसोय बघून त्यांना हादरा बसला. या गैरव्यवस्थेचा एक व्हीडीओ तयार करून त्यांनी आपल्या परिचयातील एका वरिष्ठ पोलिस अधिका-याला पाठवला. अधिका-यांमार्फत तो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यापर्यंतही पोहचला. त्यानंतर इथली वैद्यकीय व्यवस्था खडबडून जागी झाली. पाण्याचा पाईप फुटल्याचा व्हीडीओ मी पाहिला आहे. या रुग्णालयाच्या इमारतींमध्ये काही गैरसोई आहेत हे नाकारून चालणार नाही. परंतु, त्या तातडीने दूर करून रुग्णांची योग्य पध्दतीने काळजी घेण्याबाबत सुचना मी दिल्या आहेत. येत्या दोन - तीन दिवसांत त्या दूर होतील असे जिल्हाधिका-यांनी लोकमतशी बोलताना प्रांजळपणे नमुद केले आहे.खासगी रुग्णालयात भरतीया रुग्णाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सिव्हिल रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा दाहक अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे सरकारी उपचारांवर विसंबून न राहता ते घोडबंदर रोड येथील होरायझन या खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. होरायझन रुग्णालयात केवळ कोरोनाग्रस्तांवरच उपचार होतील असे पालिकेने जाहिर केले आहे. 

सिव्हिलची निवडच चुकीची ?राज्य सरकारने सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारती पाडून तिथे नवे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार इथले वॉर्ड स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू होती. जुन्या इमारतीमध्ये कोणत्याही स्वरुपाची डागडूजी आणि दुरूस्तीची कामे गेल्या काही महिन्यांत झालेली नाहीत. त्यामुळे या इमारतींमध्ये असंख्य अडचणी आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिव्हिलची निवड करणेच चुकीचे होते असे मत एका वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केले आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या