कामासाठी ठेकेदार मिळेना : जुन्याच ठेकेदारांना काम देण्याचा प्रशासनाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा महापालिकेच्या कामकाजाला फटका बसत आहेत. जानेवारीच्या पंधरवड्यानंतरही नालेसफाईच्या कामासाठी ठेकेदार मिळत नसल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे. त्यामुळे जुन्याच ठेकेदारांना हे काम देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने मांडला आहे. मात्र, निविदा न काढता जुन्या ठेकेदारांना नियुक्त करण्याचा प्रस्ताव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी नाले सफाईच्या कामाचा बोजवारा उडाला होता. काेरोनाकाळात नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा फटका गेल्या पावसाळ्यात बसला. मात्र पुढच्या वर्षी पालिका निवडणुका असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महापालिकेच्या कामावर बारीक लक्ष आहे. गेल्याच आठवड्यात राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. त्याप्रमाणे पूरमुक्त मुंबईसाठी आराखडा तयार करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे. यामध्ये महत्त्वाची जबाबदारी असलेल्या नाले सफाईच्या कामासाठीच ठेकेदार मिळत नसल्याने मोठी अडचण उभी राहिली आहे.
पालिका यंदा पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यांच्या साफईसाठी ४७ कोटी सात लाख रुपये खर्च करणार आहे. सन २०२०-२०२१ या वर्षासाठी पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्याच्या सफाईसाठी पालिकेने फेब्रुवारी २०२०पासून चारवेळा निविदा मागवल्या. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने अशासकीय संस्थांच्या कामगारांकडून नालेसफाई करून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनीही कोरोनामुळे काम करण्यास असमर्थता दर्शवली. अखेर २०१९-२०२० या आर्थिक वर्षात नालेसफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारांकडूनच हे काम करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.
नाले सफाईचा खर्च वाढला
महापालिकेने गेल्यावर्षी नालेसफाईच्या कामासाठी ४६ कोटी ५८ लाख रुपये खर्च केले होते. यावर्षी ४७ कोटी सात लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्यक्षात गेल्या वर्षी पालिकेने या कामासाठी ४३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला होता. मात्र विभागानुसार ठेकेदारांनी पाच ते २२ टक्के दराने जादा निविदा भरल्या होत्या.