Join us  

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला 1300 लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 7:34 AM

सरकारची परवानगी; माेजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोरोनामुळे लग्नसराई आणि सण-समारंभ साजरे करण्यावर बंधने घालण्यात आली. पण कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात सुमारे १३०० लग्नांचा बार उडाल्याची माहिती समोर आली आहे.मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू केल्यामुळे संपूर्ण देश ‘घरबंद’ होता. मात्र, विवाहाची स्वप्ने रंगवलेल्या अनेकांचा यामुळे हिरमोड झाला. मत्स्यगंधा नाटकातल्या ‘गुंतता हृदय हे...’ या पदाच्या बोलांप्रमाणे काहींची स्थिती झाली. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या लग्नेच्छुकांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडण्याची परवानगी दिली. शासनाने दिलेल्या या परवानगीनंतर  आतापर्यंत जवळपास १३०० लग्नांचा बार उडाला.

एप्रिल कठीणचएप्रिल महिन्यात १३ लग्नमुहूर्त आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे शासनाने लग्नातील उपस्थिती २५ पर्यंत कमी केली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य पुढे ढकलले आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत ५० हून कमी लग्ने झाल्याची माहिती मंगल कार्यालय संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे लग्नेच्छुकांसाठी एप्रिल हा कठीणकाळ ठरत आहे.

वर्षभरात १०५ लग्नतिथीएप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १०५ लग्नमुहूर्त होते. त्यात एप्रिलमध्ये ४, मे ९, जून ९, जुलै १२, ऑगस्ट १४, ऑक्टोबर ८, नोव्हेंबर ८, डिसेंबर ८, जानेवारी १४, फेब्रुवारी १२, मार्चमधील १० मुहूर्तांचा समावेश होता. या काळात मुंबईत तब्बल १३०० जण लग्नबंधनात अडकले. रजिस्टर्ड लग्नांकडे कल कोरोनामुळे लग्नातील उपस्थिती मर्यादित करण्यात आल्याने अनेक जणांनी रजिस्टर लग्नास पसंती दर्शविली. खर्चातही बचत होत असल्याने पालकांनीही मुलांच्या रजिस्टर्ड विवाहास विरोध केला नाही. मात्र, यामुळे मंगल कार्यालये, त्यावर अवलंबून असलेल्या घटकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्याची माहिती सुमंगल कार्यालयाचे विनोद पवार यांनी दिली.ताेट्यात व्यवसाय१३०० हा आकडा फार काही मोठा नाही. मुंबईत दरवर्षी याच्या तिप्पट विवाह होतात. शासनाने लग्नातील उपस्थितीवर मर्यादा लावल्याने मंगल कार्यालयांचे कंबरडे मोडले आहे. २५ माणसांत विवाहाचे आयोजन करणे म्हणजे पूर्णतः तोट्यात व्यवसाय करण्यासारखे आहे.-विनोद पवार, सुमंगल कार्यालय, कुर्ला

नियमांचे पालन राजकीय सभांना परवानगी दिली जाते. लग्नसोहळ्यांवर मर्यादा, हा दुजाभाव आहे. आम्ही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून विवाहाचे नियोजन करतो. शासनाने किमान २०० माणसांच्या उपस्थितीस परवानगी द्यावी, अन्यथा आम्हाला आर्थिक मदत द्यावी.- दादाजी पाटील, शगून बॅक्विट, साकीनाका

टॅग्स :लग्न