Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही पाडवा शोभायात्रांवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:10 IST

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागल्याने काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ...

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागल्याने काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मुंबईतदेखील कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागल्याने गर्दी जमेल अशा सर्व कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेक सण, लग्नसोहळे तसेच विविध कार्यक्रम आयोजकांच्या वतीने रद्द करण्यात आले आहेत.

यंदा १३ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढीपाडवा सणावरदेखील कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईत आयोजित होणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबईत दरवर्षी गोरेगाव, अंधेरी, कुर्ला, विलेपार्ले, दादर या परिसरामध्ये पाडवा शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते. तर गिरगावात मुंबईतील सर्वांत मोठी पाडवा शोभा यात्रा निघते. या वेळेस तरुण-तरुणी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पारंपरिक वेषभूषा करीत एकमेकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतात. अनेक ठिकाणी बाइक रॅली तसेच चित्ररथांची रॅलीदेखील आयोजित करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाचे संकट पाहता या शोभायात्रा रद्द होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी राज्यात नुकतेच कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने पाडवा शोभायात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा पाडवा शोभायात्रांना परवानगी मिळते की नाही? याकडे आयोजकांचे लक्ष लागून राहिले आहे.