Join us

कोरोनामुळे लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST

मुंबई : कोरोनामुळे माणसांची जीवनशैली बदलली आहे. याचा आता अनेक गोष्टींवर परिणाम जाणवत आहे. आता कोरोनामुळे वर आणि वधूच्या ...

मुंबई : कोरोनामुळे माणसांची जीवनशैली बदलली आहे. याचा आता अनेक गोष्टींवर परिणाम जाणवत आहे. आता कोरोनामुळे वर आणि वधूच्या लग्नासाठीच्या अपेक्षांमध्येदेखील बदल झाला आहे.

पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळी लग्न जमवून देतील तिथे मुला-मुलींची लग्न होत असत. मात्र आता लग्न जमवून देणे हा एक व्यवसाय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण लग्न जमविण्यासाठी वधू-वरांनी अनेक अटी समोर ठेवलेल्या असतात. यामध्ये मुलींच्या अटी मुलांपेक्षा कित्येक पटीने जास्त असतात. मात्र आता कोरोनामुळे या अटींमध्ये अधिक भर पडली आहे. मुलींच्या लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या अपेक्षांची पडली भर...

कोरोनामुळे अनेक नोकरी - व्यवसायांवर गदा आली. त्यामुळे मुली शक्यतो डॉक्टर, इंजिनीअर, सरकारी नोकरी तसेच एखाद्या कंपनीत किंवा बँकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी असणाऱ्या मुलाला पसंती दर्शवत आहेत. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या बाबतीत अत्यावश्यक सेवांमध्ये जे व्यवसाय टिकले व फायद्यात राहिले असा व्यवसाय करणाऱ्या मुलांनाच पसंती मिळत आहे. तसेच कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलापेक्षा एखाद्या मोठ्या सोसायटीत २, ३ बीएचके फ्लॅट असणाऱ्याला किंवा उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट असणाऱ्या मुलांना पसंती मिळत आहे.

या अपेक्षा झाल्या कमी

अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिल्याने आता लग्नासाठी मुंबईतच घर पाहिजे किंवा रेल्वे स्थानकाच्या जवळच घर पाहिजे अशा अपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या आसपास असणाऱ्या शहरांमध्ये चांगल्या सोसायटीत घर असणाऱ्यालाही पसंती मिळत आहे.

कोरोनामुळे जीवनशैली बदलून गेली आहे. त्यामुळे काही मुला - मुलींच्या अटी - अपेक्षा वाढल्या आहेत, तर काही ठिकाणी कमीदेखील झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यामुळे सरकारी नोकरी असणाऱ्यांना प्राधान्य मिळत आहे. तसेच मुलाची नोकरी अत्यावश्यक सेवेमध्ये येते का, याबद्दलदेखील पारखून पाहिले जात आहे. मुलांपेक्षा मुलींच्या अपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

- अनंत मोरजकर (वधू - वर सूचक)