Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी आर मध्य कार्यालयात समन्वय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:03 IST

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या बोरीवली पश्चिम येथील आर मध्य कार्यालयात नुकतीच महापालिका प्रशासन व शिवसेना विभाग क्र. १ ...

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या बोरीवली पश्चिम येथील आर मध्य कार्यालयात नुकतीच महापालिका प्रशासन व शिवसेना विभाग क्र. १ मधील नगरसेवकांची नुकतीच समन्वय बैठक संपन्न झाली.

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग ट्रॅकिंग या प्रणालीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

या बैठकीत खासगी रुग्णालयातील खाटा ८० टक्के खाटा आरक्षित करणे, दहिसर येथील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करणे, कोविड रुग्ण मिळालेल्या विभागात प्रभावीपणे सॅनिटायझेशन करणे इत्यादी उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र वाढविण्यासंबंधी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली.

आर मध्य व आर उत्तर वॉर्डच्या प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार विलास पोतनीस यांच्यासह शिवसेना विभाग क्रमांक १ मधील सर्व नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी यांची समन्वय बैठक आर मध्य विभाग कार्यालय येथे पार पडली. यावेळी करण्यात आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले.

याप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद, संजय घाडी, हर्षद कारकर, शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण, तेजस्वी घोसाळकर, आर मध्य वॉर्डच्या डॉ. भाग्यश्री कापसे, आर उत्तर वॉर्डच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर आदी उपस्थित होते.