मुंबई : गणेशोत्सवादरम्यान रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याची महापालिकेची मागणी न्यायालयाने फेटाळल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मदार संपूर्णत: वटहुकूमावर आहे. शिवाय या प्रकरणी आता महापालिका काय धोरण निश्चित करणार? याकडेही समितीचे डोळे लागून राहिले आहेत. तसेच फडणवीस सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय भूमिका घेणार? याकडेही समितीचे लक्ष आहे.गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी देण्याची मुभा असावी, अशी मागणी करणारा महापालिकेचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आणि महापालिकेसह समितीचे धाबे दणाणले. यासंदर्भात अधिक माहिती देताना समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवादरम्यानच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समितीने यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वटहुकूमासाठी सेना आग्रही राहील, असे आश्वासन त्या वेळी उद्धव यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे समितीसोबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर यातून मार्ग काढण्यात यावा यासाठी समिती प्रयत्नशील आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत तोडगा निघण्याची वाट पाहत आहे. शिवाय महापालिकाही आता काय धोरण निश्चित करते ते पाहणे महत्त्वाचे आहे, असे दहिबावकर म्हणाले. कायदा-सुव्यवस्थेबाबत समिती सजगगणेशोत्सवादरम्यान महापालिकेने मंडप उभारण्यास परवानगी दिली तरी वाहतूक पोलीस मंडळांना नियमांत बसवतील आणि ऐन उत्सवाच्या वेळी पालिकेकडून मंडपांवर कारवाई केली जाईल. परिणामी, प्रत्यक्षात कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसू नये म्हणून समिती अधिक सजग आहे.
समन्वय समितीची मदार वटहुकूमावर
By admin | Updated: July 19, 2015 04:29 IST