Join us

समन्वय समिती ‘त्या’ मंडळांच्या पाठीशी

By admin | Updated: September 15, 2015 04:53 IST

मुंबई महानगरपालिकेकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अर्ज केलेल्या २ हजार २६ सार्वजनिक मंडळांपैकी ४१३ मंडळांचे अर्ज पालिकेने नामंजूर केले आहेत. तर ९५७ मंडळांचे अर्ज अद्याप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अर्ज केलेल्या २ हजार २६ सार्वजनिक मंडळांपैकी ४१३ मंडळांचे अर्ज पालिकेने नामंजूर केले आहेत. तर ९५७ मंडळांचे अर्ज अद्याप पोलीस आणि महापालिका प्रशासनस्तरावर परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र परवानगी नाकारलेल्या आणि परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडळांनीही दणक्यात उत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना पाठिंबा दिला आहे.समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा घोषित केला. तसेच पालिका प्रशासनाने कारवाई केल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शवली. दहिबावकर म्हणाले, की काही मंडळांनी नकाशे सादर केले नसल्याने पालिकेने परवानगी नाकारल्याचे कारण समजले. मात्र परवानगी नाकारण्याआधी मंडळांना एक संधी देण्याची गरज होती. एकूण अर्जांमध्ये केवळ ६२७ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या एक खिडकी योजनेचा तर पुरता बोजवारा उडाल्याची टीका समितीने केली. एकूण १५ प्रकारच्या परवानग्या मंडळांना काढाव्या लागतात. मात्र पोलीस, वाहतूक पोलीस आणि पालिका यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मंडळांना परवानगी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रारही समितीने यावेळी व्यक्त केली.महिलांची छेडछाड नको !गणेशोत्सवाच्या १० दिवसांत मंडळात महिलांची छेडछाड झाल्याची तक्रार येऊ देऊ नका, असा दमच समितीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला आहे. त्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांना महिलांशी सभ्यतेने वागण्याचे प्रशिक्षण देण्याचे आवाहन समितीने केले. शिवाय महिलांसाठी प्रत्येक मंडळाने शक्य असेल, तर वेगळी रांग तयार करण्याचा सल्लाही समितीने दिला.खड्डे, विसर्जनस्थळांची करणार पाहणीसमन्वय समितीचे सदस्य आणि महापौर स्नेहल आंबेकर मंगळवारी मुंबईतील विसर्जन स्थळ आणि खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. तरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे विसर्जन सोहळ््यात कोणतेही विघ्न येऊ नये, असे आवाहन समितीने पालिकेकडे केले आहे. चार रात्री होणार दणदणाटप्रशासनाने १८, २१, २६ आणि २७ सप्टेंबर या चार रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास सूट दिलेली आहे. परिणामी या चारही रात्री ढोलताशांसह डीजेचा दणदणाट होणार आहे.दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटींचे उद्दिष्टसार्वजनिक गणेशोत्सव समितीने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमधून एक कोटी रुपये जमा करून दुष्काळग्रस्त निधीसाठी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी मंडळांना रोषणाईवर करण्यात येणाऱ्या खर्चात कपात करण्याचे आवाहन समितीने केले आहे. शिवाय बाप्पासमोरील दानपेटीमधील काही निधी दुष्काळग्रस्तांसाठी राखून ठेवण्याची विनंती समितीने सर्व मंडळांना केली आहे.मराठी गाणीच वाजवा !गणेशोत्सवाच्या १० दिवसांत आणि विसर्जनावेळी मंडळांनी मराठी सुगम संगीत आणि भक्तिगीते वाजवण्याचे आवाहन समन्वय समितीने केले आहे. परंपरा जपण्यासाठी रिमिक्स आणि ओंगाळवाण्या नृत्यांना बगल देण्याचा सल्लाही समितीने दिला.