Join us

कूपर रुग्णालयाचे माॅडेल लसीकरण केंद्र सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:16 IST

मुंबई : पालिकेच्या डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयाच्या उपाहारगृहाच्या समोर चार हजार चौरस फूट इमारतीचे २९ डिसेंबरपासून त्याचे मॉडेल लसीकरण ...

मुंबई : पालिकेच्या डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयाच्या उपाहारगृहाच्या समोर चार हजार चौरस फूट इमारतीचे २९ डिसेंबरपासून त्याचे मॉडेल लसीकरण केंद्रात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, कूपर रुग्णालयात मॉडेल केंद्र तयार करण्यासाठी आता ३०हून अधिक मजूर रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करत आहे.

रुग्णालयाच्या उपाहारगृहासमोर असलेली ही इमारत यापूर्वी वसतिगृह म्हणून वापरली जायची. मार्च महिन्यात तिचे कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण केंद्रात रूपांतर केले गेले. आता हीच इमारत मॉडेल लसीकरण केंद्र म्हणून रूपांतरित करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदार एकॉन यांना सोमवारी रात्रीपर्यंत हे केंद्र पालिकेच्या स्वाधीन करण्यास सांगितले आहे. येत्या शुक्रवारपासून पूर्णपणे काम करण्यास तयार असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी ही माहिती दिली. या केंद्रात भूलतज्ज्ञ, श्वसनविकारतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांचा सहभाग असेल. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात पालिकेच्या सात रुग्णालयांसह कूपर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यात १.२६ लाख आरोग्य सेवा कामगारांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

अशी आहे व्यवस्था

या लसीकरण केंद्रात प्रवेशद्वारानजीक प्रतीक्षा केंद्र आहे. तसेच तीन लसीकरण कक्षांची उभारणी करण्यात आली आहे, एका कक्षात पाच जणांना लस देता येऊ शकते. या केंद्रात निरीक्षण कक्षही असून त्या ठिकाणी लस दिल्यानंतर रुग्णांचे काही काळ निरीक्षण करण्यात येईल. याखेरीज, अन्य दोन कक्ष असून या ठिकाणी स्वयंसेवकांवर काही दुष्परिणाम जाणवल्यास उपचार करण्यात येणार आहेत.