Join us
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाचे शुल्क न परवडणारे

By admin | Updated: January 13, 2017 06:39 IST

शहरात होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या रसिकांकडून

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीशहरात होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या रसिकांकडून आकारण्यात येणारे प्रतिनिधी शुल्क जास्त आहे. त्यामुळे या शुल्काबाबत संमेलनाचे आयोजक असलेल्या आगरी युथ फोरमने फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा, राज्यभरातून संमेलनात सहभागी होऊ इच्छिणारे रसिक संमेलनाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.नाशिकचे साहित्य रसिक सोमनाथ पगार यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी शुल्क तीन हजार रुपये आहे. त्यात तीन दिवसांचे भोजन व राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तीन दिवस केवळ भोजन हवे असल्यास दीड हजार रुपये आकारले जाणार आहेत. साहित्य संमेलनात जास्तीतजास्त रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तीन दिवसांचे शुल्क रसिकांना परवडणारे नाही. संमेलनात रसिक परिसंवाद, अध्यक्षांचे विचार ऐकायला येतो. शुल्क जास्त असल्यास तो संमेलनाला उपस्थिती लावणे टाळेल, असे पगार म्हणाले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी कल्याणला झालेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनात गावाकडील माणसे, हेच खरे मराठीचे वारकरी आहेत, असा उल्लेख केला होता. त्याचा आधार घेतल्यास गावाकडच्या वारकऱ्याला तीन व दीड हजारांचे शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे गावाकडील माणूस संमेलनाला मुकेल. संमेलनात मराठीचा वारकरी नसेल, तर मराठीची वारी कशी होणार? भाषेच्या विठ्ठलाची भेट कशी होणार, असा सगळा प्रश्न केवळ जास्त शुल्कामुळे उपस्थित केला जाईल, असे पगार यांचे म्हणणे आहे.संमेलनासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने त्याची जमवाजमव आगरी युथ फोरम करत आहे. सरकार, महापालिकेने रक्कमा दिल्या आहेत. इतर ठिकाणांहूनही निधी मिळणार आहे. त्यामुळे रसिकांच्या खिशाला भुर्दंड बसू नये, अशी अपेक्षा पगार व इतर रसिकांचीही आहे....तर श्रीमंतांचेच संमेलनअनेक चॅनल्सवर संमेलनाचे थेट प्रक्षेपण होईल. तेच पाहून रसिक संमेलनात सहभागी झाल्याचे समाधान मानेल. चॅनल्सवर संमेलन त्याला फुकटच पाहता येईल. ज्याच्या खिशात पैसा आहे, तेच रसिक संमेलनात सहभागी होतील. साहित्य संमेलन केवळ श्रीमंताचेच, अशी टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरिबांना तेथे वाव नाही, असे पगार म्हणाले.