Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या कमिशनवरून बैठकीत वादंग

By admin | Updated: April 26, 2015 02:25 IST

एमआरपीपेक्षा जास्त दराने होणारी दूधविक्री रोखण्यासाठी झालेल्या बैठकीत विक्रेत्यांनी दादागिरीची भाषा केली.

मुंबई : एमआरपीपेक्षा जास्त दराने होणारी दूधविक्री रोखण्यासाठी झालेल्या बैठकीत विक्रेत्यांनी दादागिरीची भाषा केली. यापुढेही चढ्या भावानेच दूध विकणार, योग्य कमिशन न मिळाल्यास संपूर्ण राज्यात ब्रँडेड कंपनीच्या दुधावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाने घेतली.जादा दराने होणाऱ्या दूधविक्रीबाबत तोडगा काढण्यासाठी शनिवारी सर जेजे स्कूल आॅफ आर्ट्समध्ये ग्राहक संघटना, वितरक संघटना, दूध कंपन्या आणि प्रशासनामध्ये बैठक झाली. या बैठकीला वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय उपस्थित होते.बैठकीदरम्यान दूध विक्रेते, उपवितरक, वितरक, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी आणि दूध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू मांडली. सर्व गुंतागुंत कमिशनवरून निर्माण झाल्याचा सूर सर्वांनीच आळवला. एकंदरीतच दूध कंपनी ते ग्राहक या साखळीत वाढलेल्या घटकांमुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचा सूरही उमटला. दूध कंपन्यांकडून उपविक्रेते आणि दुकानदारांना योग्य कमिशन मिळत नसल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली. तर दूध वितरकांना योग्य कमिशन मिळते़ मात्र ते विक्रेते उपविक्रेत्यांना योग्य कमिशन देत नसल्याचा आरोप कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केला. योग्य कमिशन मिळत नसेल, तर ग्राहकांच्या खिशाला चाट पाडू नका, अशी मागणी ग्राहक संघटनांनी केली.आरे वगळता इतर दूध कंपन्यांकडून कमी कमिशन मिळत असल्याची तक्रार अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाने केली. अन्य कंपन्यांचे कमिशन पुरेसे नसल्याने एमआरपीहून जास्त दराने दूध विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ठाणे आणि दिव्यातील विक्रेत्यांप्रमाणे संपूर्ण राज्यात ब्रँडेड कंपन्यांच्या दुधावर बहिष्कार टाकण्याचा इशारा विक्रेता संघाने दिला. एका दूध कंपनीचे प्रतिनिधी कंपनीची बाजू मांडत असताना काही विक्रेत्यांनी व्यासपीठावर येत गोंधळ घातला. त्यामुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला, मात्र नियंत्रक पाण्डेय यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. (प्रतिनिधी)अकाउंटन्ट जनरलची मदत घेणारदुधाचे उत्पादन शुल्क ठरवण्यासाठी राज्याच्या अकाउंटन्ट जनरलची मदत घेणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. विजेच्या दराप्रमाणे दुधाचे उत्पादन शुल्क ठरवल्यास कमिशनचा मुद्दाही सुटेल़ मे महिन्याआधी नवे नियम करू, असे आश्वस्त केले. कमिशनच्या मुद्द्यावर सोमवारी बैठक कमिशनच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पाण्डेय यांच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात विशेष बैठक होणार आहे. त्यात दूध कंपनी, वितरक, विक्रेते, दुकानदार यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.