Join us  

आयसीटीतील प्राध्यापकाच्या कंपनीलाच कोट्यवधींची कंत्राटे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 8:21 AM

लाली दाम्पत्याचं चांगभलं : ९१ वर्षे जुन्या संस्थेत ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’

यदु जोशी

मुंबई : राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) या अभिमत विद्यापीठात २५ वर्षांपासून कार्यरत प्रा. अरविंद लाली व त्यांची पत्नी प्रीती यांच्या विद्यान बायोकॉमर्स प्रा. लि.ला आयसीटीकडून कोट्यवधी रुपयांची पुरवठ्याची कंत्राटे देण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यासंबंधीची सर्व कागदपत्रे लोकमतच्या हाती आली आहेत.विद्यापीठाचे नऊ वर्षांपासून कुलगुरू असलेले डॉ. जी. डी. यादव यांनी कंपनीला आयसीटीमध्ये पुरवठादार म्हणून नोंदणी करण्यास परवानगी दिली. त्यामुळे तेही संशयाच्या घेऱ्यात आहेत. १९३७ पासून आयसीटी ही संस्था कार्यरत असून २००४ मध्ये तिला स्वायत्तता मिळून २००८मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला होता.

शासनाने आयसीटीसाठी निश्चित केलेल्या परिनियमानुसार संस्थेतील शिक्षक संस्थेशी निगडित कोणताही व्यापार, धंदा, खासगी शिकवणीत सहभागी होऊ शकत नाही. संस्थेतील शिक्षक अथवा त्या त्याचे नातेवाईक संस्थेतील कोणत्याही मालमत्तेच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. संस्थेमध्ये मालपुरवठा अथवा सेवा पुरविण्यासाठी निविदा सादर करू शकत नाही. संस्थेस कोणत्याही प्रकारचा माल अथवा सेवा पुरवून त्यासाठी संस्थेतर्फे धनादेश स्वीकारू शकत नाही. प्रा. लाली यांनी या परिनियमांचा भंग केल्याचे स्पष्ट दिसते. हे प्रकरण ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’मध्ये मोडते.

आयसीटीमध्ये संशोधनासाठी लागणाºया उपकरणे व रसायनांचा पुरवठा विद्यान बायोकॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडने केला. त्यासाठी ५ कोटी ७० लाख रुपये आयसीटीकडून कंपनीला २०१४ ते २०१८ दरम्यान अदा करण्यात आले. या कंपनीचे मालक स्वत: अरविंद लाली आणि त्यांची पत्नी प्रीती लाली हे असून त्यांचे कंपनीत अनुक्रमे ७५ आणि २५ टक्केहिस्सा आहे.लाली यांच्यावर शिस्तभंगाची शिफारसआयसीटीच्या खरेदी समितीच्या १८ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रा.लाली हे विद्यान बायो-कॉमर्स कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्या कंपनीला देण्यात आलेले सर्व कार्यादेश रद्द करण्यात यावेत. तसेच आयसीटी व्यवस्थापनाने प्रा. लाली यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी.आरोप तर होतच असतात. चौकशी अहवालात ‘दुध का दुध’ होईलच. आमच्या संस्थेचे, माझे कार्य या विषयी आपल्याला काही माहिती आहे का? यशाला अनेक शत्रू असतात. त्या प्रमाणे माझ्यावर निराधार आरोप होत आहेत.- प्रा. अरविंद लाली, रसायन तंत्रज्ञान संस्था

टॅग्स :मुंबई