Join us

मुंबई काँग्रेसमधील धुसफूस कायम

By admin | Updated: January 9, 2017 07:09 IST

महापालिका निवडणुका अगदी महिन्याभरावर आल्या असल्यातरी मुंबई काँग्रेसमधील धुसफूस कायम आहे.

मुंबई : महापालिका निवडणुका अगदी महिन्याभरावर आल्या असल्यातरी मुंबई काँग्रेसमधील धुसफूस कायम आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एककल्ली कारभाराविरोधातील नाराजी रविवारी पुन्हा उफाळून आली. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोकणवासियांच्या मेळावे भरविण्याची घोषणा केली होती. विलेपार्ले येथे रविवारी सायंकाळी झालेल्या पहिल्या मेळाव्यास मुंबईतील अनेक काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेस नेते गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ज्यांना पक्षात काडीची किंमत नाही त्यांच्याकडे कारभार आहे. पक्षाच्या बैठकांची, कार्यक्रमाची माहितीही अन्य नेत्यांना दिली जात नाही. अलीकडेच जाहिरनामा तयार करण्यासाठी ज्या बैठका झाल्या त्यातही डावलण्यात आल्याचा आरोप कामत यांनी केला. कामत यांच्या आरोपांना निरुपम यांनी आपल्या भाषणातून थेट उत्तर दिले. अद्याप जाहिरनामा तयार झाला नाही. मग त्याची माहिती देणार कशी असा सवाल करतानाच आम्हाला आमची जबाबदारी कळते, अशा शब्दात निरुपम यांनी कामतांना प्रतिउत्तर दिले. काँग्रेसमधील गटबाजी कायम असल्याने परिवर्तन कसे होणार असा सवाल केला जात आहे. संजय निरुपम गटाकडून अन्य नेत्यांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत असल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजपा विरोधात म्हणावे तशी आघाडी उघडता येत नसल्याची खंत मुंबई काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. (प्रतिनिधी)