Join us

कंगना रनौतविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:07 IST

देशद्रोह प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : न्यायालयात दिलेल्या आश्वासनाचे पालन न केल्याबद्दल बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर न्यायालय ...

देशद्रोह प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : न्यायालयात दिलेल्या आश्वासनाचे पालन न केल्याबद्दल बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर न्यायालय अवमान कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

देशद्रोह प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पोलीस तपासासंबंधी कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी कंगनाने उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र, ८ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदविल्यावर तिने एक व्हिडीओ ट्विटरद्वारे प्रसिद्ध केला आणि त्या व्हिडीओत तिने पोलीस तपासासंबंधी काही वक्तव्ये केली आहेत.

चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरली ऊर्फ साहिल अश्रफअली सय्यद यांनी कंगनाविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

कंगना व तिची बहीण रंगोली ट्विट करून धर्मावरून समाजात फूट पाडत आहेत. द्वेष निर्माण करत आहेत, असे म्हणत मुन्नावरली याने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार केली होती. सोमवारी त्यांनी उच्च न्यायालयात कंगनाविरोधात अवमान याचिका दाखल केली.

वांद्रे न्यायालयाने कंगना व रंगोलीवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कंगनाने आपण या तपास प्रकरणाबाबत समाजमाध्यमांवर काहीही भाष्य करणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयाला दिली होती.

मात्र, ८ जानेवारी रोजी पोलिसांकडे जबाब नोंदविल्यावर तिने पोलीस आपली छळवणूक करत आहेत, असा दावा तिने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

न्याय प्रशासनात व न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याबद्दल कंगनावर न्यायालय अवमान कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

......................