Join us

१६ ते ८० वर्षे वयोगटातील कलाकारांचे 'कन्टेम्प्ररी आर्ट एक्झिबिशन'

By संजय घावरे | Updated: February 8, 2024 20:12 IST

३० कलाकारांच्या ७७हून अधिक कलाकृतींसाा समावेष

मुंबई - 'कन्टेम्प्ररी आर्ट एक्झिबिशन'च्या आठव्या प्रदर्शनात भारतासह नेपाळमधील १६ ते ८० वर्षे वयोगटांतील ३० कलाकारांच्या ७५ हून अधिक कलाकृती कलाप्रेमींचे लक्ष वेधणार आहेत. नवोदित आणि दिग्गज कलाकारांच्या कलाकृतींचा संगम या प्रदर्शनात घडणार आहे.

वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये १३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान 'कन्टेम्प्ररी आर्ट एक्झिबिशन' भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात स्थापत्य, अमूर्त, लँडस्केप, कन्टेम्प्ररी , मोज़ेक, मिक्स मीडिया आणि पेंटिंग्जमधील पोट्रेट्स यासह विविध कलाकृतींचा समावेश असेल. येथे काही शिल्पेसुद्धा असणार आहेत. प्रदर्शनातील विक्रीतून मिळालेल्या रकमेचा काही भाग ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी एनजीओ अलर्ट सिटीझन फोरमकडे दिला जाईल. कलाकार सत्येंद्र राणे यांच्याद्वारा आयोजित आणि कलाकार नम्या गुप्ताद्वारा सहआयोजित या प्रदर्शनात या वर्षी दिग्गज आणि  नवोदित कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश असेल . 

आठव्या सहयोग कन्टेम्प्ररी आर्ट एक्झिबिशनमध्ये संपूर्ण भारतातील मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद, बंगलोरसह नेपाळमधूनही कलाकार सहभागी होणार आहेत. यात अर्पितो गोप, मधुमिता बसू, पूनम फर्नांडिस, स्नेहा निकम, कमल अहमद, भारती ढवळे, ऋषिका जलान, सत्येंद्र डी. राणे, नंदिता देसाई, दिप्ती देसाई, विभा शर्मा, रेवती शिवकुमार, अद्योत राजाध्यक्ष, वैशाली कानडे, विरेश पटाली, उषा चावडा, साजिया अन्सारी, तानिया, विधी दोशी, शैलजा कामत, नम्या गुप्ता, अंतरा तिब्रेवाल, प्रशांत जाधव, कासिम कनासावी, अनुपमा मांडवकर, राम अवस्थी, जय नानावटी, आध्या शिवकुमार, सुमंत शेट्टी. स्मिता राणे यांच्या कलाकृती असतील.