खालापूर : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कलोते गावाच्या हद्दीत रिंकी हॉटेलजवळ पनवेल बाजूकडून खोपोलीकडे येणाऱ्या कारला कंटेनरने जोरात धडक दिल्याने कारमधील एक जण जागीच ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. खालापूर तालुक्यातील नवघर येथील मच्छिंद्र गजानन देशमुख ( ४०) व मंगेश देशमुख (४२) हे कलोते येथील रिंकी पॅलेस या हॉटेलमध्ये जेवणासाठी मारूती कारमधून गेले होते. जेवण केल्यानंतर ते पुन्हा खोपोलीकडे परत येत असताना कंटेनरने कारला धडक दिल्याने मंगेश देशमुख हा जागेवरच ठार झाला तर मच्छिंद्र देशमुख व बी. पी. शेख (२५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.जखमी महिलेबाबत पूर्ण माहिती मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून सदर महिला हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
कंटेनरची कारला धडक
By admin | Updated: July 1, 2015 22:40 IST