विक्रमगड : पर्यायी जागेअभावी विक्रमगड येथील तहसिल कचेरीच्या नवीन इमारतीचे बांधकाम रेगाळले आहे. जनतेच्या सोयीच्या दृष्टीने सर्व कार्यालय एकत्र आणण्यासाठी विक्रमगड तहसिल कार्यालयाचे नवीन इमारत बांधण्यासाठी जागा पाहिल्या परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे जागा उपलब्ध होत नसल्याने हा कारभार जुन्याच इमारतीत सुरू आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीत अपूर्ण जागा व सोयीसुविधाचा अभाव असून याच ठिकाणी भव्य प्रशासकीय इमारत बांधावी जेणेकरून लोकांना सोयीचे जाईल.तालुका निर्मिती होऊन १४ वर्षे झाली परंतु या तहसिल कार्यालयाचा कार्यभार जुन्या असलेल्या मंडळ कार्यालयात सुरू आहे. त्यातच निवडणूक दाखले देणे, संजय गांधी निराधार हे विभाग निवास इमारतीत सुरू आहे. अशा अपुऱ्या जागेत किती काळ कामकाज सुरू राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीचा आराखडाही तयार केला परंतु जागेअभावी हे काम होत नसल्याचे सांगितले तरी जनतेच्या सोयीच्या दृष्टीने जागा बघावी व लवकरात लवकर इमारत व्हावी अशी जनतेची मागणी आहे.तसेच ग्रामीण रूग्णालयाचीही इमारत जागेच्या अभावामुळे येथे होऊ शकत नाही. त्या इमारतीच्या जागेचा वाद मिटवावा व जागा ताब्यात घेवून या ठिकाणी निवास इमारत बांधता येईल. गेल्या अनेक वर्षापासून कार्यालय व्यवस्थेचे नियोजन नसल्याने या समस्येला कर्मचाऱ्यांना आणि नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. तरी तालुक्यातील या अपूर्ण राहिलेल्या इमारती पूर्ण कराव्यात अशी मागणी नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)
विक्रमगड तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम रखडले
By admin | Updated: March 15, 2015 22:50 IST