Join us  

टिळक ब्रिजसाठी स्पॅन गर्डरची उभारणी; जलदगतीने काम सुरू असल्याची महारेलची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:38 AM

दादर येथील टिळक रोड ओव्हरब्रिजचे काम वेगाने सुरू असून, नुकतेच या ब्रिजच्या स्पॅन गर्डरची उभारणी करण्यात आली आहे.

मुंबई : दादर येथील टिळक रोड ओव्हरब्रिजचे काम वेगाने सुरू असून, नुकतेच या ब्रिजच्या स्पॅन गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. येथील ५ पैकी २ गर्डर उभे करण्यात आले असून, उर्वरित कामेही वेगाने सुरू आहेत, अशी माहिती महारेलकडून देण्यात आली.

पूर्व-पश्चिम दादरला जोडणाऱ्या टिळक ब्रिजमुळे लोअर परळ, प्रभादेवी, वरळी ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंतच्या वाहतुकीला चांगली कनेक्टिव्हिटी मिळते आहे. आता महारेलने येथील जिओ टेक्निकल काम, जागेवरील युटीलिटीज स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण केले आहे. ब्रिजचे काम जलदगतीने सुरू असून, केबल स्टेड ब्रिजचे काम ६४० दिवसांत पूर्ण होईल. मध्य रेल्वे आणि महापालिका यांच्यातील समन्वयावर या कामाची गती अवलंबून आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या ब्रिजजवळील नवीन ब्रिजचे बांधकाम वाहतुकीला अडथळा येणार नाहीत, अशा पद्धतीने केले जात आहे.

दादर येथील टिळक रोड ओव्हर ब्रिजचे काम वेगाने सुरू असून, नुकतेच या ब्रिजच्या स्पॅन गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. (छाया : दत्ता खेडेकर)

१) वाहतूक नव्या ब्रिजकडे वळवत जुना ब्रिज पाडला जाईल. दुसऱ्या बाजूची पुनर्बांधणी पूर्ण करण्यात येणार आहे.

२) केबल स्टेड पुलाच्या प्रत्येक भागाची एकूण लांबी ६०० मीटर असून प्रत्येक भागाची रुंदी १६.७ मीटर आहे. 

३) वाहतुकीसाठी ३ अधिक ३ लेन असतील. पुलाच्या बांधकाम खर्चाची एकूण किंमत ३७५ कोटी रुपये आहे.

४)  पहिल्या टप्प्यात एकूण ७ फाउंडेशन बांधण्यात येतील.

५)  ७ पैकी ५ फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे.

६)  रेल्वे भागात पायलॉनसह उर्वरित २ फाउंडेशनचे काम प्रगतिपथावर आहे.

७)  पिअर कॅपपर्यंत दोन्ही बाजूच्या अॅप्रोच स्पॅन्सचे काम पूर्ण झाले आहे.

८)  अ‍ॅप्रोच स्पॅनसाठी सर्व स्टील गर्डर तयार असून, गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामध्य रेल्वे