Join us

जुहू गावात स्थगितीनंतरही बांधकाम सुरूच

By admin | Updated: December 16, 2014 01:48 IST

जुहूगावातील एका बेकायदा बांधकामावर न्यायालयीन स्थगिती असतानाही संबधित बांधकामधारकांकडून रात्रीच्या वेळी छुप्या पध्दतीने बांधकाम सुरू ठेवल्याचे उघड झाले आहे

नवी मुंबई: जुहूगावातील एका बेकायदा बांधकामावर न्यायालयीन स्थगिती असतानाही संबधित बांधकामधारकांकडून रात्रीच्या वेळी छुप्या पध्दतीने बांधकाम सुरू ठेवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी येत्या १९ डिसेंबर रोजी सुनावणी असून स्थगितीनंतरही सुरू असलेल्या या बांधकामांचा सविस्तर अहवाल सिडकोच्या वतीने न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.जुहूगावातील केंद्रीय सुरक्षा दलाच्या वसाहतीजवळ अगदी दर्शनी भागात एक अनधिकृत इमारतीचे काम सुरू आहे. यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित केल्यानंतर सहा महिन्यापूर्वी या बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच हे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोच्या वतीने या बांधकामाला पुन्हा नोटीस बजावली होती. तसेच त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजीची कारवाई निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याअगोदरच संबधित बांधकामधारकाने न्यायालयातून सिडकोच्या या कारवाईला स्थगिती मिळविली. असे असले तरी स्थगिती असतानाही बांधकाम सुरूच ठेवल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोच्या पथकाने कारवाई करून तेथील बांधकाम साहित्य जप्त केले होते. त्यानंतरही बांधकामांचा धडाका सुरूच असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी १९ डिसेंबर रोजी सुनावणी असून सिडकोच्या वतीने स्थगितीनंतरही बांधकाम सुरू असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. तसेच स्थगीती उठविण्याची मागणी करण्यात येणार आहे. स्थगिती आदेश उठताच या बांधकामांवर धडक कारवाई केली जाईल, असे सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अनिल पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)