Join us

मुंबईत २४ डिसेंबरला संविधान गौरव बहुजन महामोर्चा

By admin | Updated: November 17, 2016 06:13 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी २४ डिसेंबरला मुंबईत संविधान गौरव बहुजन महामोर्चाची हाक देण्यात आली

मुंबई : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी २४ डिसेंबरला मुंबईत संविधान गौरव बहुजन महामोर्चाची हाक देण्यात आली आहे. या महामोर्चाची पूर्वतयारी म्हणून २६ नोव्हेंबरला मुंबईत बाईक रॅली काढणार असल्याचे महामोर्चा समितीने सांगितले.अ‍ॅट्रॉसिटीसह दलित-आदिवासी अन्याय-अत्याचाराचे खटले विशेष न्यायालयात चालवा आणि महार वतनी जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करा, या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईत सर्वसमावेशक संविधान गौरव बहुजन महामोर्चाचे आयोजन केल्याचे समितीने सांगितले. या महामोर्चासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक, आदिवासी व ओबीसी समाजघटकांची एक संयुक्त बैठक कालीना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात पार पडली. या बैठकीत बहुजन समाजातील वकील, डॉक्टर, पत्रकार, प्राध्यापक, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, सामाजिक संघटनांचा समावेश होता. राजकीय पक्षांचे प्रतिनिधीनीही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुंबईत निघणारा महामोर्चा हा पूर्णपणे अराजकीय असावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिवाय सुशिक्षित तरुण तरुणींनी त्याचे नेतृत्व करावे, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी घटकातील सर्व लोकप्रतिनिधींना या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. महामोर्र्चाची पूर्वतयारी म्हणून २६ नोव्हेंबर या ‘संविधान दिनी’ संपूर्ण मुंबई शहरातून बाइक व कार रॅली काढून तिचा समारोप दादर चैत्यभूमी येथे केला जाईल, तर ११ डिसेंबर रोजी मुंबईत संविधान व अ‍ॅट्रॉसिटी जनजागरण परिषदेचे आयोजन केले जाईल. त्या आधी जिल्हा आणि तालुकानिहाय जनजागरण बैठक घेण्यात येतील, असेही समितीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)