मुंबई : 1995मध्ये भाजपा-शिवसेनेचे लोक आमचे नेते शरद पवार यांची बदनामी करूनच सत्तेत आले होते. अलीकडे नरेंद्र मोदी यांनी तेच केले. आता भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हेही तेच करीत आहेत. बदनामीचे हे षड्यंत्र आपल्या प्रचारात हाणून पाडण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने आज केला. आरोप करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत पण मर्यादा पाळतील ते भाजपावाले कसले, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वेळी केला.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ आज पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, एकेकाळी शरद पवार यांच्याविरुद्ध ट्रकभर पुरावे देण्याची भाषा करून बदनामी केलेली होती. कधी भुजबळ, अजित पवार तर कधी तटकरे अशा आमच्या नेत्यांची विनाकारण बदनामी करण्यात आली. आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाची पंतप्रधानांनी कानउघाडणी का केली, हे समोर येत आहे. त्याचा जाब राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी विचारला पाहिजे.
आम्ही सत्तेत आल्यापासूनच्या सर्व अर्थसंकल्पांची बेरीज केली तर ती 3 लाख 75 हजार कोटी रुपये होते. मग आघाडीच्या कार्यकाळात 11 लाख 88 हजार कोटींचे घोटाळे झाल्याचा अमित शहा कशाच्या आधारावर करतात, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. छगन भुजबळ यांनी सेना-भाजपा युतीच्या
नेत्यांची यथेच्छ खिल्ली उडविली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात;
तर तिकडे भाजपावाले विदर्भ राज्य होणारच
असे सांगतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा करून मोदी मुंबईच्या व्यापा:यांना ‘सुरत आवजो’ म्हणून आमंत्रण देतात, असे भुजबळ म्हणताच एकच हशा पिकला. (विशेष प्रतिनिधी)
भुजबळांकडून मराठय़ांची प्रशंसा
ओबीसी नेते म्हणून प्रसिद्ध असलेले छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची प्रशंसा केली. ‘मराठय़ाविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापट यांच्या ओळींची आठवण त्यांनी करून दिली. मराठा हा शब्द व्यापक अर्थाने वापरत त्यांनी, पुरोगामी महाराष्ट्राची ताकद भाजपा-शिवसेनेला दाखवून द्या, असे आवाहन केले.
मग हे लव्ह सनातन का?
भाजपाने चालविलेल्या लव्ह जिहादविरोधी मोहिमेची भुजबळ यांनी खिल्ली उडविली. भाजपा नेत्यांच्या मुलींनी मुस्लिमांशी विवाह केला आहे, मग हा कुठला जिहाद? हे लव्ह सनातन आहे का, असा मिश्कील सवालही त्यांनी केला.