मुंबई : शहीद हेमंत करकरे यांच्या वीरपत्नी कविता करकरे यांच्या दु:खद निधनाबद्दल ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी ‘लोकमत परिवारा’तर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्या वेळी करकरे यांच्या कन्या जुई आणि तिचे पती देवदत्त नवरे उपस्थित होते. दर्डा यांनी करकरे दाम्पत्यांच्या आठवणी जागवल्या. शिवाय कविताताईंनी अवयवदान करून समाजापुढे खूप मोठा आदर्श घालून दिल्याचे सांगितले. ‘लोकमत सखी मंच’च्या राज्यभर मोठय़ा प्रमाणावर महिला सदस्या आहेत. त्या सा:यांसाठी त्यांनी घालून दिलेला आदर्श नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असेही दर्डा या वेळी म्हणाले.
देवदत्त नवरे व जुई यांनी या वेळी कौटुंबिक प्रसंगही सांगितले. देवदत्त बोस्टन (अमेरिका) येथे बँकेत कार्यरत आहेत. परदेशातून देखील इंटरनेटच्या माध्यमातून आईच्या निधनाचे वृत्त वाचून अनेकांनी आम्हाला फोन केले, ईमेल केले असे सांगून ‘लोकमत’ने व्यक्त केलेल्या भावनांविषयी जुई यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या वेळी ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर आणि संपादकीय विभागातील ज्येष्ठ सदस्य दर्डा यांच्यासमवेत होते. देवेंद्र दर्डा यांनी पुष्पचक्र अर्पण करून संवेदना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)