Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटू हिकेन शहाच्या विनंतीवर विचार करा, उच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’ला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 02:10 IST

केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून एखाद्या खेळाडूला निलंबित करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुंबईकर क्रिकेटपटू हिकेन शहा याने निलंबन मागे घेण्यासंदर्भात

मुंबई : केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून एखाद्या खेळाडूला निलंबित करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुंबईकर क्रिकेटपटू हिकेन शहा याने निलंबन मागे घेण्यासंदर्भात केलेल्या विनंतीवर विचार करण्याची सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली.हिकेन शहा मुंबईचा फलंदाज असून त्याला कथित मॅच फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने जुलै २०१५ मध्ये निलंबित केले. बीसीसीआयच्या या निर्णयाला शहाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. बीसीसीआयने निलंबनाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला बाजू मांडण्याची संधीच दिली नाही, असे शहाने याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.बीसीसीआयने या प्रकरणी अद्याप एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवली नसून या प्रकरणी अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती शहाच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.बीसीसीआयच्या या वर्तणुकीमुळे याचिकाकर्त्याच्या (शहा) मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. याचिकाकर्ता दोन वर्षांपासून निलंबित आहे. एकप्रकारे तो शिक्षा भोगत आहे,’ असे न्या. केमकर यांनी म्हटले.‘तुम्ही (बीसीसीआय) आतापर्यंत एकही साक्षीदार तपासला नाही. केवळ ऐकीव गोष्टींवरून तुम्ही त्याला (शहा) निलंबित केले आहे. कोणीही कोणाबाबत काहीही म्हणेल आणि त्यावरून कारवाई कराल? तुम्ही खेळाडूंना अशा प्रकारे वागवू शकत नाही,’ असे न्या. कुलकर्णी यांनी म्हटले. शहाने केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करा, अशी सूचना करत न्यायालयाने शहाच्या याचिकेवरील पुढील सुनावणी जानेवारीमध्ये ठेवली.

टॅग्स :बीसीसीआय