Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांवरील प्रवासबंदी शिथिल करण्याबाबत विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातील कोरोनास्थितीत जूननंतर सुधारणा झाली आहे. त्यामुळे भारतीयांवरील प्रवासबंदी शिथिल करण्याबाबत विचार करावा, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतातील कोरोनास्थितीत जूननंतर सुधारणा झाली आहे. त्यामुळे भारतीयांवरील प्रवासबंदी शिथिल करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने आघाडीच्या देशांना केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाल्याने एप्रिलच्या मध्यावर बहुतांश देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली. अमेरिका, युरोपियन राष्ट्रे, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशांनी निर्बंध लागू केल्याने हवाई वाहतूक क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यातून सावरायचे असल्यास भारतासारख्या देशावरील प्रवासबंदी उठविण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने म्हटले आहे.

या संघटनेचे प्रमुख विली वॉल्श म्हणाले, १० ते ३० जूनदरम्यान हरित राष्ट्रांमधून (कोरोनाचा धोका कमी असलेले देश) यूकेमध्ये आलेल्या प्रवाशांचा पॉझिटिव्हीटी दर हा ०.२९ टक्के होता. मध्यम धोका असलेली राष्ट्रे ०.६२, तर भारतासारख्या अतिधोकादायक राष्ट्रांमधून आलेल्या प्रवाशांचा पॉझिटिव्हीटी दर १.०६ टक्के नोंदविण्यात आला. या अहवालाचा विचार करता भारतातून बाहेरच्या राष्ट्रांत कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.

दुसरीकडे, भारतातील देशांतर्गत प्रवासी संख्या कोरोना पूर्वकाळाप्रमाणे वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय द्वारे खुली झाल्यास हवाई वाहतूक क्षेत्राला उभारी घेता येईल. याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून भारतीयांवरील प्रवासबंदी शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.