Join us

महाविद्यालयीन निवडणुकांवर एकमत

By admin | Updated: July 7, 2015 03:21 IST

महाविद्यालयांमध्ये पुन्हा विद्यार्थी परिषदेच्या (स्टुडंट कौन्सिल) निवडणुका घेण्याबाबत आज सर्वच विद्यार्थी संघटनांनी सहमती दर्शविली.

मुंबई : महाविद्यालयांमध्ये पुन्हा विद्यार्थी परिषदेच्या (स्टुडंट कौन्सिल) निवडणुका घेण्याबाबत आज सर्वच विद्यार्थी संघटनांनी सहमती दर्शविली. निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. विद्यापीठ कायदा १९९४मधील प्रस्तावित दुरुस्ती आणि विद्यार्थी परिषद निवडणुका या विषयाबाबत चर्चा करून निर्णय घेण्याकरिता सर्व संघटनांनी दोन प्रतिनिधींची नावे द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नॅशनल स्टुडंटस युनियन आॅफ इंडिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एसएफआय, नॉर्थ इस्ट स्टुडंट असोशिएशन, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तावडे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, १९९१ पासून बंद झालेल्या विद्यार्थी परिषद निवडणुका व्हायला पाहिजेत. विद्यार्थी परिषद निवडणुकांमधून समाजातील प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व निर्माण होते. त्यामुळे या निवडणुका कशा स्वरूपाच्या असाव्यात, त्या कुठल्या पद्धतीने घेण्यात याव्यात, त्या थेट पद्धतीने घेण्यात याव्या किंवा कसे, तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींना कोणते अधिकार असावेत, याबाबत पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)