मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी सरसकट विरोध दर्शविला असला तरी राष्ट्रवादीला मात्र अद्याप अधिकृत प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह मुंबईतील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आघाडीला विरोध असल्याची भूमिका वेळोवेळी जाहीरपणे मांडली आहे. मुंबईत राष्ट्रवादीची विशेष ताकद नसल्याने आघाडी केल्यास काँग्रेसला फटका बसणार असल्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेकदा पक्षाच्या व्यासपीठावर मांडली होती. आपल्याच कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा प्रवाह काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेस नेत्यांनी आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादीकडून मात्र सबुरीची भाषा वापरली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा टाळली असून आघाडीबाबत निर्णय घेण्याचा तगादा लावला आहे. मर्यादित वेळेपर्यंत वाट पाहिली जाईल मात्र आम्हीही सर्व जागा स्वबळावर लढविण्याची तयारी केल्याचे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला प्रतीक्षा काँग्रेसच्या उत्तराची
By admin | Updated: November 9, 2016 06:05 IST