Join us

काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

By admin | Updated: May 19, 2015 23:18 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ‘एकला चलो रे’ अशी राहील, कोणाशीही आघाडी अथवा युती होणार नाही,

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ‘एकला चलो रे’ अशी राहील, कोणाशीही आघाडी अथवा युती होणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले. सकाळपासून सुरू झालेल्या दौऱ्यात त्यांनी कार्यालयांची उद्घाटने केली तसेच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या निवडणुकीमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. या निवडणुका स्वबळावर लढण्याचे आमचे धोरण आहे. बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना-भाजपा युती यापैकी एकाही पक्षासमवेत आम्ही जाणार नाही. केंद्रातील भाजप सरकारला वर्ष झाले. पण लोकहिताची कामे करण्यात त्यांना अपयश आले. केवळ जाहीरातबाजी करून हे सरकार सत्तेवर आले. भूमी अधिग्रहण कायदा करताना त्यांनी एका विशिष्ट वर्गाला झुकते माप दिले आहे. समाजातील वंचित घटक यांना न्याय मिळू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या वसई विरार परिसराचा जो विकास झाला तो आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाला. आम्ही महानगरपालिकांना विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी दिला त्यामुळेच हे शक्य झाले. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आमच्याकडून होईल. पक्षाची धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस कार्यकर्ते नक्कीच करतील. आम्ही आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष दत्ता नर, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, काँग्रेसचे नेते विकास वर्तक उपस्थित होते.