Join us  

'घराणेशाहीची परीक्षा राजकारणातच असते, इतर क्षेत्रात नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:27 PM

घराणेशाहीची परीक्षा ही राजकारणात आहे बाकी कोणत्या क्षेत्रात नाही. घराणेशाहीपासून कोणतेच क्षेत्र लांब राहिलं नाही असं मतं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे

मुंबई - राजकीय नेत्यांवर नेहमी घराणेशाहीचा आरोप होत असतो मात्र दर 5 वर्षांनी राजकारणातील घराणेशाहीला परीक्षा द्यावी लागते, त्यांना लोकांमध्ये जाऊन जनमतं घ्यावं लागतं, घराणेशाहीची परीक्षा ही राजकारणात आहे बाकी कोणत्या क्षेत्रात नाही. घराणेशाहीपासून कोणतेच क्षेत्र लांब राहिलं नाही असं मत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे. लोकमत फेसबुक लाईव्हच्या मुलाखतीत सत्यजीत तांबे यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

राजकारणात तरूणांना यावे त्यांना संधी देऊ असं राजकीय नेते बोलतात मात्र राजकीय नेत्यांच्या मुलांनाच ही संधी दिली जाते का ? या प्रश्नावर उत्तर देताना डॉ. सत्यजीत तांबे म्हणाले की, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होता, उद्योगपतीचा मुलगा उद्योगपती होतो. वकीलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. आज कोणतंही क्षेत्र घेतलं तरी घराणेशाही लांब राहू शकत नाही, वारसाने किंवा घराणेशाहीने तुम्हाला संधी मिळते मात्र तुमचं कर्तृत्व तुम्हालाच सिद्ध करावं लागतं असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत राजकारणात अनेक मोठे नेते आहेत त्यांची मुलं कायच करू शकली नाही अशी उदाहरणे आहेत. तुम्हाला संधी मिळते त्याचा वापर तुम्ही कसं करता यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं, स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो त्यामुळे घराणेशाहीमुळे कोणी राजकारणात येत नसेल तर त्यांनी गैरसमज दूर करावा. तुमच्यात कर्तृत्व असेल नक्कीच राजकारणात या असं आवाहन डॉ. सत्यजीत तांबे यांनी राजकारणातील तरूणांना केलं आहे.

राजकारणात अनेक नेत्यांची मुलं उच्चशिक्षित आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, गुरुदास कामत यांचा मुलगा डॉक्टर आहे. कामत यांच्या निधनानंतर अनेक पक्षांनी त्यांच्या मुलाला राजकारणात यायची विनंती केली मात्र त्याने नकार दिला. बाकी क्षेत्रातील घराणेशाहीला परीक्षा नसते तर राजकारणातील घराणेशाहीला दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते, लोकांसमोर जावं लागतं, जनमत घ्यावं लागतं असं दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी सांगायचे असं बोलून सत्यजीत तांबे यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :लोकसभा निवडणूकसत्यजित तांबेलोकमतराजकारण