Join us  

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 4:41 PM

काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते अॅड. महादेव शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महादेव शेलार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे. महादेव शेलार 64 वर्षांचे होते.

मुलुंडमधील राहत्या घरी महादेव शेलार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना मुलुंडमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, पंचनामा सुरू असून घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलमध्ये महादेव शेलार यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.

महादेव शेलार यांनी दुपारी अडीच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. विलवा कुंज सोसायटी, मुलुंड पश्चिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी फोर्टीस हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून  दाखल पूर्व मयत घोषित केलं. सदर बाबत पोलिसांनी ADR No-136/17   अन्वये नोंद घेतली असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे.

महादेव शेलार हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्तेपद यशस्वीपणे सांभाळलं होतं. प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे निमंत्रक म्हणूनही ते काम पाहत होते. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालकपद आणि मुंबई सहकारी मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविलं.  महादेव शेलार यांच्या आत्महत्येची घटना काँग्रेस वर्तुळाला हादरवणारी आहे.

पेशाने वकिल राहिलेले महादेव शेलार हे अभ्यासू व सुसंस्कृत नेते होते. काँग्रेस पक्षाची बाजू मांडताना ती अतिशय संयमाने व अभ्यासपूर्ण बोलायचे. 2014 साली केंद्रात व राज्यात भाजपा सरकार येण्यापूर्वी भाजपाचे विविध नेते काँग्रेसवर कडवी टीका करायचे.त्यावेळी महादेव शेलार वृत्तवाहिन्यांवर आपल्या पक्षाची भूमिका संयमाने मांडत असत.

टॅग्स :आत्महत्याइंडियन नॅशनल काँग्रेसमुंबई