मुंबई : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. दोन वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुकीत पराभवाची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी आक्रमक आणि पक्षबांधणीत वाकबगार नेत्याला संधी देण्याकडे पक्षनेतृत्वाचा कल असून इच्छुकांनी तशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वत:कडे खेचण्यासाठी देवरा आणि गुरुदास कामत सक्रिय झाले आहेत. दोन्ही गटांकडून पसंतीच्या उमेदवारांची नावे पुढे केली जात आहेत. कामत गटाने विद्यार्थी चळवळीत पुढे आलेल्या अमरजित मनहास यांचे, तर देवरा गटाकडून माजी मंत्री आ. नसीम खान यांचे नाव पुढे केले जात आहे. पक्षाचा मुस्लीम चेहरा असणाऱ्या खान यांच्या नेतृत्वात एमआयएमचे आव्हानही मोडून काढता येणार असल्याचा दावा समर्थक करीत आहेत. याशिवाय भाई जगताप, माजी खासदार संजय निरुपम यांनीही प्रयत्न चालविले आहेत.विद्यमान अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांच्या नेतृत्वातच दोन्ही निवडणुकांत काँग्रेसला मुंबईतील वर्चस्वावर पाणी सोडावे लागले. मुंबईत लोकसभेच्या सर्व जागा गमावल्यानंतरही चांदूरकरांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली. मात्र पक्षाला कार्यक्रम देण्यात चांदूरकर अपयशी ठरल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. अभ्यासू आणि दलित चेहरा म्हणून चांदूरकरांना संधी दिली मात्र त्याचा पक्षाला फायदा झाला नाही. महत्त्वाच्या प्रश्नांवरही प्रभावी आंदोलने झाली नाहीत. एकीकडे महापालिकेतील गैरकारभार आणि दुसरीकडे मुंबईकरांवर भाडेवाढ आणि करवाढीचा बोजा टाकला जात आहे. विरोधी पक्ष म्हणून याचा वापर करू शकेल अशा नेत्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)वर्षा गायकवाडही चर्चेतऐनवेळी महिला नाव चर्चेत आल्यास वर्षा गायकवाड यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. प्रिया दत्त यांना रोखण्यासाठी खान आणि कृपाशंकर यांनी गायकवाड यांचे नाव पुढे केल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस आक्रमक चेहऱ्याच्या शोधात
By admin | Updated: January 22, 2015 02:10 IST