Join us

काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी तडीपार!

By admin | Updated: October 20, 2014 04:16 IST

अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या व नव्या जिल्ह्यातल्या प्रथमच ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक लागले

विशेष प्रतिनिधी, ठाणेअत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या व नव्या जिल्ह्यातल्या प्रथमच ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक लागले असून या जिल्ह्यातून मतदारांनी राष्ट्रवादी, मार्क्सवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना तडीपार केले आहे. त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. बहुजन विकास आघाडीने नालासोपरा, वसई, बोईसर या ३ मतदारसंघांत विजयाची शिटी वाजवून आपले जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले आहे. या जिल्ह्यात भाजपाला २ तर शिवसेनेला १ जागा मिळाली आहे. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा धक्कादायक असा पराभव पालघरमध्ये घडून आला, तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर विजयी झालेल्या विवेक पंडित यांना बविआचे सूत्रधार हितेंद्र ठाकूर यांनी पराभवाची धूळ चारली. मार्क्सवाद्यांचा गड असलेल्या डहाणूत भाजपाने त्यांना पाणी पाजले. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जो धडा शिकवला, त्याचा योग्य बोध घेऊन बहुजन विकास आघाडीने व्यूहरचना केली. त्याचा फायदा बविआला या निवडणुकीत झाला. तिचे संख्याबळ २ चे ३ वर गेले. भाजपाने आपली १ जागा कायम ठेवून त्यात आणखी एका जागेची भर घातली. शिवसेनेला गेल्या वेळी या मतदारसंघात अजिबात स्थान नव्हते, ते तिने आता पालघरमध्ये कृष्णा घोडा यांच्या रूपाने प्राप्त केले आहे. नालासोपाऱ्यात बविआचे क्षितिज ठाकूर, वसईत बविआचेच हितेंद्र ठाकूर आणि बोईसरमध्ये बविआचे विलास तरे विजयी झाले. पालघरमध्ये राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या कृष्णा घोडांनी विजय मिळविला, तर डहाणूची जागा भाजपाने मार्क्सवाद्यांकडून हिरावून घेतली. तिथे पास्कल धनारे हे विजयी झाले, तर चिंतामण वनगा खासदार झाल्यामुळे रिक्त झालेल्या विक्रमगडमध्ये भिवंडी ग्रामीणमधून स्थलांतरित झालेल्या विष्णू सावरा यांनी विजय मिळविला आहे. माजी राज्यमंत्री शंकर नम, मनीषा निमकर यांच्यासह अनेकांनी पक्ष बदलून आपापल्या उमेदवाऱ्या दाखल केल्या होत्या. त्या सगळ्यांना मतदारांनी नाकारले. मात्र, राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या कृष्णा घोडा यांना पालघरमधून विजयी केले, हे आश्चर्य म्हटले पाहिजे.शंकर नम, मनीषा निमकर, राजेंद्र गावित अशा तीन माजी मंत्र्यांचा पराभव घडवून पालघरमधील मतदारांनी आपण मंत्रीपदाला फारशी किंमत देत नाही, याचा प्रत्यय आणून दिला आहे. ठाणे जिल्ह्यात डहाणू हा मार्क्सवाद्यांचा गड समजला जातो. परंतु, भाजपाने त्यांच्याकडून तो हिरावून घेतला आहे. या मतदारसंघात राजाराम ओझरे हे मार्क्सवादी आमदार होते. त्यांना उमेदवारी नाकारून व त्यांच्या मुलालाही उमेदवारी न देऊन त्यांना बंडखोरीस उद्युक्त करणे व त्यांनी बंड केल्यावर त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे, अशा आत्मघाती खेळ्या मार्क्सवादी खेळली. त्यातून त्यांचा हा गड भाजपाने धराशयी केला. सेनेच्या पाठिंब्यावर गेल्या वेळेला विजयी झालेले विवेक पंडित यांनी विकासविरोधाचे केलेले राजकारण त्यांच्या अंगलट आले. त्यांचा वसईत पराभव झाला. आता बदलत्या राजकारणात तीन आमदार असलेला बहुजन विकास आघाडी हा राज्यातील पाचव्या क्रमांकाचे संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. त्यामुळे सरकार कोणाचेही येवो, त्याला बविआची मदत घ्यावी लागली तर या पक्षाच्या आमदारांना मंत्रीपद मिळणे संभवनीय आहे. सर्व लाटा आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी केलेला प्रचाराचा झंझावात यावर मात करून बविआने हे यश मिळविले आहे. हे विशेष म्हटले पाहिजे. राष्ट्रीय पक्ष जिथे थिटे पडले तेथे बविआने आघाडी घेतली.