Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीच्या निकालाने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उत्साह

By admin | Updated: September 17, 2014 02:13 IST

देशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाला मोठा फटका बसल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई : देशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाला  मोठा फटका बसल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने नाऊमेद झालेल्या आघाडीचे नेते पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्यास या निकालाने मोठी मदत होईल, असे मानले जात आहे. 
कोल्हापुरात आज झालेल्या राष्ट्रवादीच्या जंगी मेळाव्यात बहुतेक वक्त्यांनी या निकालांचा संदर्भ देत आता महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेनेला धक्का बसेल आणि सत्ताप्राप्तीचे त्यांचे स्वप्न अधुरे राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. 
लोकसभा निकालात आघाडीला महाराष्ट्रात दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आघाडीच्या गोटात निरुत्साहाचे वातावरण होते.  तथापि, आघाडीच्या नेत्यांनी आज जाहीरपणो बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला.
‘परिस्थिती हाताबाहेर गेली असे मानण्याचे कारण नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी पराभवाच्या पाश्र्वभूमीवर जोरदार यश मिळवू शकते तर काँग्रेस, राष्ट्रवादी नक्कीच चमत्कार करू शकेल, अशी प्रतिक्रिया आज दिवसभर काँग्रेसच्या 
गोटातून व्यक्त होत होती. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये 
उत्साह संचारण्याच्या दृष्टीने 
आजच्या निकालाने मदतच होणार आहे, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता आत्मविश्वासाने सांगत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
पोटनिवडणुकीत मोदी आणि भाजपाची फसवी आश्वासने, दुटप्पी धोरणो आणि ढोंगी राष्ट्रवाद उघडा पडला आहे. विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांना मिळालेले यश हे त्याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांनाच यश मिळेल.              
 - माणिकराव ठाकरे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.