Join us

भाववाढीविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: July 7, 2014 01:08 IST

केंद्र शासनाने एका महिन्यातच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करून सर्वसामान्यांवर भार टाकला आहे.

पनवेल : केंद्र शासनाने एका महिन्यातच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करून सर्वसामान्यांवर भार टाकला आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. ‘वाह रे मोदी तेरा कैसा खेल, मेहंगा रॉकेल, मेहंगा तेल मेहंगा तेल’ अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी घंटानाद केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होतीच त्याचबरोबर काँग्रेस कार्यक र्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मोर्चाचे नेतृत्व करीत केंद्र शासनविरोधात टीकेची झोड उठवली.मोदी सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांना आंदोलन करावे लागणार हे निश्चित होतेच. मात्र एका महिन्यात रस्त्यावर उतरावे लागेल असे वाटत नव्हते, असे प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. जनतेच्या उरावर महागाईचा धोंडा टाकणाऱ्या मोदी सरकारला वठणीवर आणण्यासाठी कितीही वेळा रस्त्यावर उतरायची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करीत असताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करू असे आश्वासन दिले होते. मात्र या उलट शासनाने मूलभूत वस्तूंचे भाव गगनाला भिडवले आहेत. रेल्वे, पेट्रोल, डिझेल स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या भावात वाढ करीत मोदींनी बुरे दिन आणले असल्याचा आरोप आ. ठाकू र यांनी यावेळी केला. काँग्रेसची संस्कृती संघर्ष आणि आंदोलनाची आहे. त्यामुळे जनतेवर अन्याय होत असेल हा पक्ष नेहमी धावून गेला असल्याचे आर. सी. घरत यांनी सांगितले. भाजपच्या भूलथापा थांबविण्यासाठी संघर्ष करण्याचे आमच्यात सामर्थ्य असल्याचे घरत म्हणाले. काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळून काढण्यात आलेला मोर्चा पंचरत्न हॉटेल, टपाल नाका, मुसलमान नाका, नगरपालिका, श्री ब्लड बँक, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल, वाल्मिकीनगर, परदेशी आळी, जयभारत नाका, आदर्श हॉटेल या ठिकाणी फिरला व शिवाजी चौकात सांगता झाली. यावेळी नगराध्यक्ष चारुशिला घरत, काँग्रेसचे नेते जी. आर. घरत, बांधकाम सभापती राजू सोनी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, कार्याध्यक्ष अरविंद सावळेकर, शशिकांत बांदोडकर,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.