Join us

सोशल मीडियासाठी काँग्रेसची ४२८ जणांची जम्बो कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:05 IST

४८ जिल्हाध्यक्ष : २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ सदस्यांसह १० जणांची कोअर कमिटीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रोजच्या राजकीय ...

४८ जिल्हाध्यक्ष : २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ सदस्यांसह १० जणांची कोअर कमिटी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रोजच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांपासून ते निवडणूक प्रचाराचा आखाडा म्हणजे सोशल मीडिया असे सध्या चित्र आहे. सोशल मीडियात भाजप आघाडीवर असल्याचे सांगितले जात असले तरी अन्य पक्षांनीही त्याला तोडीस तोड यंत्रणा उभारली आहे. काँग्रेसने तर बुधवारी सोशल मीडियासाठी तब्बल ४२८ जणांच्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार, तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्राच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी तयार करण्यात आली. यात ४८ जिल्हाध्यक्ष, २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ प्रदेश कार्यकारिणी सदस्य व १० कोअर कमिटी सदस्य असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस आणि सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजित सपकाळ यांनी दिली.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा सारासार विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून या ४२८ पदाधिकाऱ्यांची निवड केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. साेशल मीडियावर भाजपकडून सुरू असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या, तसेच जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम काँग्रेसचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स, करतील. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मेगा कार्यकारिणी करील, असे सपकाळ यांनी सांगितले.

................................